वारसा बालमोहनचा

‘बालमोहन विद्यामंदिर’ ही शाळेत आलेल्या प्रत्येक मुलाची व्यक्तिशः काळजी घेणारी संस्था आहे. ही संस्था आदर्श होण्यासाठी सर्वांनी झटलं पाहिजे. इतर शाळांशी तुलना न करता आपण आपले ध्येय स्वतंत्रपणे, चिकाटीने व मेहनतीने साध्य केले पाहिजे.

संस्था

३ जून १९४० या दिवशी जेव्हा दादा रेगे ह्यांनी बालमोहन विद्यामंदिरची स्थापना केली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ही अशी आदर्श शाळा घडविण्याचे स्वप्न होते.

दादांसाठी ‘बालमोहन’ हा एक विचार होता. एक असा विचार, ज्या विचाराचं एकमेव सूत्र होते, ‘जे विद्यार्थ्यांसाठी चांगले, जे त्यांना आवडेल, ज्यात त्यांना आनंद मिळेल, ते सगळे माझ्या संस्थेत घडायला हवे.’

‘बालमोहन’ ही शाळेतील मुलांवर कमालीचं प्रेम असणाऱ्या एका अतिसामान्य घरातील शिक्षकाने कणाकणांनी पैसे जमा करीत, लोकांच्या मदतीने उभी केलेली संस्था आहे. ‘बालमोहन’ हे केवळ दादासाहेब रेगे या ध्येयवादी व्यक्तीचंच नाही, तर त्यांच्या बरोबरीने हजारो ज्ञात आणि अज्ञात लोकांचे स्वप्न होते आणि आहे. त्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि त्यांची इच्छाशक्ती याच्या बळावर आज बालमोहन उभी आहे आणि हेच या संस्थेचे भांडवल आहे. आजदेखील पालक ‘बालमोहन’कडे मुलाला सोपवले की निर्धास्त होतात. हा विश्वास आणि ही श्रद्धा हेच या संस्थेचे संचित आहे.

‘आपल्या भारतीय संस्कृतीची मुळं अधिक खोलवर रुजवत आकाशाला गवसणी घालणारी आणि तितकाच पाया विस्तारणारी परिवर्तनशीलता’ ही बालमोहनची ‘आधुनिकते’ची व्याख्या. त्यामुळेच जेव्हा भारतात संगणकाचं युग अवतरत होते तेव्हा महाराष्ट्रातील ज्या अगदी मोजक्या शाळांनी ‘संगणक केंद्र’ सुरु केले, त्यात बालमोहन अग्रणी होती. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणाची खिडकी जेव्हा भारतासाठी किलकिली होत होती तेव्हा काळाची पाऊले समजून आठवी, नववी, आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान इंग्रजी भाषेत शिकवायला सुरुवात करणारी बालमोहन ही पहिलीच शाळा होती.

आज जगामध्ये हीच मुले जेव्हा त्यांच्या हुशारीमुळे कौतुकाचे मानकरी ठरतात तेव्हा पदोपदी त्यांना बालमोहनची आठवण येत राहते. म्हणूनच विठ्ठलाच्या ओढीने जसे भक्तांचे पाय पंढरपुराकडे वळतात तसे बालमोहनच्या ओढीने आजही माजी विद्यार्थ्यांचे पाय पुन्हापुन्हा बालमोहनकडे वळतात.

रोज सकाळी प्रार्थनेनंतर दोन मिनिटं स्तब्ध राहून, स्तब्धतेचं नकळत महत्व समजून देणे असो किंवा रोजच्या प्रार्थनेत ‘माझे अंतर्मन विकसित होऊ दे’, ही आर्त हाक असो, मुलं या प्रक्रीयेतून स्वत:च्या मनाशी संवाद साधायला शिकतात. भातुकलीच्या वेळेस शाळेत मुलं भोजन बनवण्यात सहभागी होतात आणि त्यांच्या बालमनात ‘सहभागातून विकास’ हे तत्व नकळत रुजते. त्याच भातुकलीच्या सहभोजनात सहभागी होताना सर्व जात-धर्म-प्रांताच्या भिंती सहजपणे गळून पडतात. शाळेत आजदेखील मुलांच्या स्वागताला रोज शिक्षकांनी उभे राहून त्यांचे स्वागत करणे असो किंवा घरातील आई-वडील, आजी-आजोबा या नात्यांचा आदर राखणे असो, यातून प्रत्येक नात्याचा उचित आदर राखलाच गेला पाहिजे ही भावना मुलांवर सहजपणे बिंबते. आपण ‘का आणि कसे जगावे’ ह्याचा वस्तुपाठ ज्यांनी घालून दिला आहे अशा आपल्या छत्रपती शिवराय, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांचे शाळेच्या आवारातील अर्धाकृती पुतळे उत्तुंगतेची प्रेरणा देतात. शाळेच्या आवारातील ले. दिलीप हेमचंद्र गुप्ते, ले. प्रकाशनारायण श्रीधर कोटणीस ह्यांचे पुतळे त्यागाचे आणि समर्पणाचे संस्कार देतात आणि आपल्या सैन्यदलाबद्दलचा आदर वाढवतात. सीमेवर शहीद झालेल्या जवानांना वाहिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीतून त्यांच्या त्यागाला आणि राष्ट्रप्रेमाला सलाम केला जातो. विचारपूर्वक पण नकळत केलेले असे अनेक संस्कार हे ‘बालमोहन’ या पंचाक्षरी शब्दाचे लेणे आहे. आजच्या घडीला या महापुरुषांबरोबर स्व. दादासाहेबांचा पुतळाही या संस्कारांची सदैव आठवण करून देतो.

बालमोहनइतकी उत्तम गुणांसाठी चोख तयारी फार कमी संस्थांमध्ये होत असेल, पण आमचा विद्यार्थी उत्तम माणूस होण्याची शिदोरी घेऊन शाळेतून बाहेर पडतो का, यावर आमचा जास्त भर असतो. जेव्हा शिकलेलं सर्व विसरले जाते तेव्हा जे उरते ते खरे शिक्षण हाच बालमोहनचा विश्वास आहे.

दादांनंतर त्यांचे सुपुत्र डॉ. बापूसाहेब रेगे आणि डॉ. बाळासाहेब रेगे ह्यांनी दादांचा विचार समर्थपणे पुढे नेला. दादांनी आपल्या दोन्ही मुलांना ‘बालसेवेचे बाळकडू योग्य वयातच पाजले होते. त्यामुळे दादांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी शाळांचा कारभार समर्थपणे चालवला. आज दादांची तिसरी पिढी दादांचे प्रतिनिधी म्हणून बालमोहनचा वसा पुढे नेत आहे.

बालमोहनच्या निर्मितीपासून समाजात अनेक सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे घडली, त्यातून तावून-सुलाखून बालमोहन आजवर डौलदारपणे उभी आहे. कारण तिच्या कणाकणात ‘दादा’ आणि हजारो विद्यार्थ्यांचा आनंद सामावलेला आहे, त्यामुळेच पुढची अनेक दशके ह्याच दिमाखाने आणि ह्याच उत्कटतेने बालमोहन उभी राहील आणि उत्तम पिढ्या घडवत राहील.

१९७६ ते १९७८ या तीनही वर्षात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान बालमोहनच्या विद्यार्थिनींनी मिळविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे सातत्य त्यापुढेही कायम ठेवले आहे. २०१० साली महाराष्ट्र सरकारने राज्य गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा बंद केली. तोवर, बालमोहनच्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्तेच्या यादीमध्ये नऊ वेळा प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम केला होता. बालमोहनची विद्यार्थिनी स्पृहा जोशी ही ‘सर्जनशील लेखना’साठी २००३ मध्ये अत्यंत प्रतिष्ठित ‘बालश्री’ पुरस्काराने प्रतिष्ठित झाली.

सौ. कुसुम नाडकर्णी (१९७२), सौ. भानुमती नाडकर्णी (१९७४), श्री. गोविंद दाभोलकर (१९८६), श्री. श्रीपाद रेगे (१९८८), श्री. अखिल भोसले (२०१२) आणि श्री. सदाशिव पाटील (२०१७) या शाळेतील सहा शिक्षकांना महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

आज ‘बालमोहन विद्यामंदिर’ हे महाराष्ट्र राज्याचे आघाडीचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. शाळेच्या नामांकित विद्यार्थ्यांत अनेक अभियंते, खेळाडू, वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, अभिनेते, गायक आणि लेखक यांचा समावेश आहे आणि संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान आहे. बालमोहनचे सुपुत्र ले. दिलीप गुप्ते आणि ले. प्रकाशनारायण कोटणीस यांनी तर देशासाठी लढताना भारत-पाकिस्तान युद्धात सर्वोच्च बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बालमोहनने हे सिद्ध केले आहे की शैक्षणिक आणि सह शैक्षणिक उपक्रमांद्वारे जोपासलेल्या शैक्षणिक परंपरेमुळेच उद्याचे स्वत:वर विश्वास असलेले, देशावर आणि जगावर प्रेम करणारे, यशस्वी, सर्जनशील आणि बुद्धिमान जागतिक नागरिक तयार होतात.

ग्रामीण आणि शहरी जीवन ह्यांचा योग्य समन्वय साधणारी, निसर्गाच्या कुशीत वसलेली आणि आधुनिक शिक्षणातून निसर्गाकडे बघण्याची दृष्टी विकसित करणारी एक शाळा असायला हवी, ही दादांचे गुरु डॉ. रामभाऊ परुळेकर यांची इच्छा. २२ जून १९७० रोजी रामभाऊंचं आणि दादांचं स्वप्न तळेगाव येथे ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’च्या रूपात पूर्ण झालं.

बदलणाऱ्या समाजाच्या गरजेनुसार झपाट्याने होणाऱ्या जागतिकीकरणाची दखल घेत समाजाभिमुखी बालमोहनने २१ जून १९९९ रोजी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली.

५ सप्टेंबर २००२ रोजी शिक्षकदिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने बालमोहनला शैक्षणिक आणि समाजकल्याण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार दिला आणि तिला राज्याची प्रमुख शैक्षणिक संस्था घोषित केली. तत्कालीन माननीय मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांनी हा पुरस्कार संस्थेला सादर केला.

आमचा असा विश्वास आहे की शाळा ही हसतखेळत शिकण्याची जागा आहे. याच पद्धतीने शिकताना मुलांची क्षमता आणि कौशल्य विकसित होतात आणि त्याला त्याच्या आवडीच्या विषयात काम करणे शक्य होते. मुलांशी त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधत आणि भारतीय परंपरा आणि मूल्यांचे जतन करीत बालमोहन हे कार्य सहजतेने साध्य करते.

दादा नेहमी म्हणायचे, ‘शाळेने मुलांना दोनच गोष्टी द्याव्यात, ज्या त्यांच्याबरोबर चिरंतन राहतील; भारतीय परंपरेत घट्ट रुजलेली मुळं आणि आकाशाला गवसणी घालायला समर्थ असे पंख.’

. . . . . . . आणि बालमोहनचा प्रवास याच विचारांवर चाललाय.

वारसा

बालमोहनच्या निर्मितीपासून समाजात अनेक सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थित्यंतरं घडली, त्यातून तावून-सुलाखून बालमोहन आजवर डौलदारपणे उभी आहे. तिच्या कणाकणात ‘दादा’ आणि हजारो विद्यार्थ्यांचा आनंद सामावलेला आहे.