आधारस्तंभ
दादा, रामभाऊ परुळेकरांना गुरुस्थानी मानत, आणि म्हणूनच त्यांच्या नावाने एक उत्तम शाळा उभारणं हेच त्यांचं उचित स्मारक ठरेल अशी दादांची धारणा होती. त्यातूनच ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’चा जन्म झाला. ह्या संपूर्ण प्रवासात दादांच्या पाठी जे खंबीरपणे उभे राहिले, त्या आधारस्तंभांप्रती बालमोहन परिवार ऋणी आहे.
रामभाऊ परुळेकर
रामचंद्र विठ्ठल परुळेकर म्हणजेच रामभाऊ परुळेकर ह्यांचा शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक खूप मोठा. रामभाऊंचं एम.ए. पर्यंतच शिक्षण मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयातून झालं. पुढे ते मालवणच्या टोपीवाला हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. १९२२ साली पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. ‘मास एज्युकेशन इन इंडिया’ आणि ‘लिटरसी इन इंडिया’ इत्यादी ग्रंथ लिहून रामभाऊंनी शिक्षणावर प्रकाश टाकला. पुढे १९४८ साली प्रसिद्ध पावलेल्या ‘घाटे-परुळेकर’ समितीचे ते सदस्य होते, ज्या समितीच्या अहवालाने माध्यमिक शिक्षकांच्या वेतनात सुधारणा झाली. तत्कालीन मद्रासचे मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी ह्यांनी मद्रासमधील प्राथमिक शिक्षणाच्या नवीन योजना तपासणीच्या कामावर नेमले होते.
बालमोहन विद्यामंदिरच्या उदघाट्न सोहळ्यात रामभाऊ स्वतः हजर होते. एकूणच बालमोहनच्या वाटचालीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. दादांवर रामभाऊंच्या विशेष जीव होता. शिक्षणाविषयीची कळकळ हा ह्या दोघांना जोडणारा दुवा.ह्याच ऋणानुबंधातून दादांनी तळेगाव येथे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनची स्थापना केली
आचार्य अत्रे
रामभाऊ स्मारकाचे प्रेरक
लेखक, पत्रकार
सौ. चित्राताई नाईक
रामभाऊ स्मारकाचे प्रेरक
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
श्री. जे. पी. नाईक
संस्थेचे स्फूर्तिस्थान
सचिव, केंद्रीय शैक्षणिक सल्लागार बोर्ड, दिल्ली.
श्री. सि. रा. तावडे
संस्थेचे स्फूर्तिस्थान
डीन, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
डी. पी. जोशी
रामभाऊ स्मारकाचे प्रेरक
स्काऊट – राष्ट्रीय व्यवस्थापक
वि. गो. कुलकर्णी
रामभाऊ स्मारकाचे प्रेरक
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या स्थापनेला १९९५ साली २५ वर्ष पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या वेळेस एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलं. ह्यावेळी दादांच्या प्रत्येक उपक्रमात त्यांच्या पाठी कायम उभे राहणारे, दादांचे स्नेही आणि ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांनी लिहिलेला लेख ह्या स्मरणिकेसाठी लिहिला होता जो पुढे महाराष्ट्र टाइम्स ह्या दैनिकात रविवार ८ जानेवारी १९९५ रोजी प्रसिद्ध झाला.
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनची उभारणी किती कठीण होती आणि त्यासाठी दादांनी आणि बाळसरांनी किती कष्ट उपसले हे मंगेश पाडगावकरांनी पाहिलं होतं. ते ज्यांनी पाहिलं त्याचंच हे शब्दांकन…
“एका सुंदर स्वप्नाचा रौप्यमहोत्सव” – मंगेश पाडगांवकर
स्वप्ने सगळेच पाहतात, पण बहुतेक माणसांची स्वप्ने ही केवळ दिवास्वप्नेच असतात ! कठोर वास्तवापासून पळून जाण्याचा तो एक प्रयत्न असतो. पण काही माणसे अगदी वेगळी असतात. त्यांच्या डोळ्यापुढे भकास दिसणारा बरड माळ असतो. या बरड माळावर हिरवीगार समृद्धी डोलत असल्याची स्वप्ने ही माणसे पाहू लागतात. हे स्वप्न पाहणे म्हणजे वास्तवाला भिऊन पळून जाणे नसते. आपल्या अपार श्रद्धेने ही माणसे वास्तवाचा बरड माळ खणत जातात. कष्टांच्या, जिद्दीच्या घामाने ही भूमी भिजवतात. हळूहळू चमत्कार प्रत्यक्षात येताना दिसू लागतो. त्यांच्या स्वप्नातले मार्दव कोंबांची हिरवीगार लवलव होऊन त्या बरड भूमीतून प्रकट होऊ लागते. मानवी निर्माणशक्तीचा एक सुंदर आविष्कार जन्माला येतो !
कै. दादासाहेब रेगे हे या जातीचे असामान्य स्वप्द्रष्टे होते. कलावंत हा चाकोरी रगडून होत नाही. तो जन्मावा लागतो, असे म्हणतात. दादासाहेब रेगे हे शिक्षण क्षेत्राताले एक असामान्य कलावंत होते असेच मी म्हणेन. शिक्षण हा दादांचा ध्यास होता, श्वास होता. मुंबईला बालमोहन विद्यामंदिर ही शाळा कष्टांचे आणि कर्जाचे डोंगर उचलून दादांनी उभी केली. शिक्षणक्षेत्रातील मानदंड अशी महत्ता या शाळेला प्राप्त करून दिली. पण इथेच थांबते तर दादा कसले ? दादांना नवे स्वप्न दिसू लागले, त्यांच्या डोळ्यासमोर तळेगाव-दाभाडे येथील अक्षरशः खडकाळ माल उभा होता. तिथे त्यांना एक सुंदर शाळा उभी असलेली दिसू लागली. दादांच्या स्वप्नाचा स्पर्श या खडकांनी भरलेल्या भूमीला झाला. या स्पर्शाने खडक मेणाहून मऊ झाले. दादांनी तिथे एक वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा उभी केली. २२ जून १९७० हा तो शुभ दिवस. ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ हे या शाळेचे नाव. बघता बघता पंचवीस वर्षे पूर्ण होत आली. हे वर्ष या शाळेचे-दादांनी साकार केलेल्या सुंदर स्वप्नाचे रौप्यमहोत्सवी वर्ष.
विलक्षण योगायोग
१९६७ सालची गोष्ट. नव्या शाळेचे स्वप्न दादांना स्वस्थ बसू देत नव्हते. तळेगावला कॉलेज काढण्याची एक कल्पना होती. या महाविद्यालयासाठी जागेची शक्यता आजमवण्याकरता आचार्य अत्रे व मॅजिस्ट्रेट श्रीखंडे तळेगावला जाणार होते. त्या दोघानांही दादांना विनंती केली की, तुम्हीही आमच्याबरोबर चला. दादांनी त्यांना होकार दिला. आपले नव्या शाळेचे सवपन करणारा एक विलक्षण योगायोग आपल्या या सहजपणे दिलेल्या होकारात दडला आहे, याची तेव्हां दादांना कल्पनाही नव्हती !
आचार्य अत्रे आणि मॅजिस्ट्रेट श्रीखंडे यांच्याबरोबर दादा तळेगावला गेले. कॉलेजसाठी जागा दाखवणारे होते श्री. विवेक क्षीरसागर. ते निघाले बालमोहन शाळेचे जुने विद्यार्थी. श्री. क्षीरसागर यांनी कॉलेजसाठी जमीन दाखवली. बोलता बोलता ते सहज दादांना म्हणले, “दादा, या जागेच्या बाजूची जमीनही मोकळी आहे. आपल्या बालमोहन शाळेची शाखा तुम्ही इथे काढावी असं मला फार वाटतं !” दादा हे वाक्य ऐकून चमकले. त्यांच्या डोळ्यातले नव्या शाळेचे स्वप्न थरारले ! रामभाऊ परुळेकर हे तपस्वी शिक्षणतज्ज्ञ दादांचे गुरु. दादांचे श्रद्धास्थान, रामभाऊ परुळेकरांचे काहीतरी उचित स्मारक करावे ही इच्छा दादांच्या मनात घर करून होती. आचार्य अत्रे यांच्याकडे पाहून दादा म्हणाले, “मला रामभाऊंचे स्मारक करून करून गुरूऋण फेडण्याची उत्कट इच्छा आहे. एका थोडं शिक्षणतज्ज्ञाचे स्मारक एखादी उत्तम शिक्षणसंस्था हेच खऱ्या अर्थाने असू शकतं… ” दादा खसनभर स्तब्ध झाले. दादांचं शब्दांतील भारावलेपण आचार्य अत्र्यांना जाणवले. भव्य स्वप्न पाहणे आणि त्यासाठी स्वतःला उधळून देणे हा आचार्य अत्रे यांच्याही व्यक्तिमत्वाचा स्थायीभावच होता. साहित्यापासून सिनेमापर्यंत आणि वृत्तपत्रापासून ते राजकारणापर्यंत विविध क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी भव्य स्वप्ने पाहिली आणि त्यांच्यामागे धावत आपल्या जीवाचे रान केले ! दादांचा सूर आचार्य अत्रे यांना जाणवणे अगदी स्वाभाविक होते. आचार्य अत्रे चटकन दादांना म्हणाले ‘ दादा, रामभाऊंचं स्मारक कराल तर तुम्हीच ! त्यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञाचं स्मारक खेडेगावात होणं ही आजची खरी गरज आहे !”
स्वप्न अंकुरले
एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून आचार्य अत्रेंविषयी दादांना आदर होता. आचार्य अत्रे यांचे शब्द दादांच्या मनाने आशीर्वाद म्हणून झेलले ! त्या क्षणी डोळ्यांसमोर दिसणारी जागा म्हणजे दगडांची खाण होती. त्या दगडांकडे पहात असताना दादांच्या मनातील स्वप्नाला हिरवेगार अंकुर फुटले !
ती जागा दहा एकर होती. चढउतार असलेली, दगडांनी भरलेली ओसाड जमीन असेच तिचे रूप होते. अवतीभवतीचे दृश्य निसर्गसुंदर होते. पण निसर्गसौंदर्याची गाणी गाऊन शाळा थोडीच उभी करता येते? त्यात पुन्हा ही दगडाळ जमीन गावापासून दूर ! त्यातल्या त्यात दोन गोष्टी दादांना धीर देणाऱ्या वाटल्या एक म्हणजे, तळेगाव जनरल हॉस्पिटलची सोय तिथे होती आणि ही जागा स्टेशनपासून दूर नव्हती.
दादांचे स्वप्न जबरदस्त खरे ! नवे योगायोग निर्माण करीत हे स्वप्न दादांच्या हातून स्वतःला जणू आकार देत होते. स्वतःच स्वतःचा शोध घेत होते. ध्येयाने भारावलेल्या स्वप्नांचे असेच असते. प्रारंभीच्या अवस्थेत हे स्वप्न पाहणारा माणूस त्या अमूर्त स्वप्नाला आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. काही काळाने हे भारलेपण अशा एका अवस्थेला जाते की, हे स्वप्न स्वतःला आणि त्या माणसालाही एक नवा आकार देऊ लागते ! ती अदृश्य स्वप्नशक्ती आता दादांना आकार देऊ लागली.
व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य
श्री. विवेक क्षीरसागर आणि दादा यांनी बसून चर्चा केली आणि दहा एकर खडकाळ-ओसाड जमीन नाममात्र भाड्याने द्यावी, अशा आशयाचा अर्ज शिक्षण खात्याकडे केला. अवघ्या तीन महिन्यात शासनाकडून उत्तर आले. दरसाल एक रुपया फक्त भाड्याने शासनाने ही जमीन दादांना दिली. आपला जुना विद्यार्थी शशिकांत नाडकर्णी याला दादा भेटले. दादांचे स्वप्न त्याच्याही मनात उतरले. दादा रेगे यांच्या व्यक्तिमत्वाचे हे एक विलक्षण असे वैशिष्ट्य होते. दादांनी मुलांना शिक्षण दिले ते केवळ क्रमिक पुस्तकातील छापील पाने पढवून नव्हे ! दादांनी मुलांना भव्य स्वप्ने पहाण्याचे आणि साकार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्याचे शिक्षण दिले. एखाद्या भव्य स्वप्नाने माणूस भारावून गेलेला असला की, त्याने केलेल्या प्रयत्नांचे ओझे बनत नाही. त्याच्या प्रयत्नांचे, कष्टांचे सुरेल गाणे होऊन जाते !
आता दादांना थांबायला वेळ नव्हता. दादांचे भव्य स्वप्न आपला आकार शोधू लागले होते. दादा आता या स्वप्नाच्या हातातले साधन बनले होते ! श्री. शशिकांत नाडकर्णी यांच्याशी चर्चा करून दादांनी संकल्पित वसतिगृहयुक्त शाळेचे प्लान्स तयार केले. शाळेच्या इमारतीची संकल्पना करताना दादांच्या हृदयातला सहृदय कलावंत जागा होता. ही शाळा शहरातली नव्हती. शहरात जागेची टंचाई. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त विद्यार्थी कोंबणे याचे नाव वर्ग ! हा प्रकार खेडेगावातील शाळेत दादांना नको होता. खेडेगावात मोकळे, निसर्गाशी सख्य जोडणारे वातावरण हा मुलांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग असला पाहिजे, अशी दादांची धारणा होती. दादांनी प्लान्स करताना प्रत्येक वर्गाच्या समोर बागकामाची मोकळी जागा राखून ठेवली.
दादा स्वभावाने अत्यंत भाविक होते. काहीसे भाबडे आणि विक्षिप्त वाटावेत एकटे भाविक. त्यांची कुलदेवता शांतादुर्गा. तिचे दर्शन घेतल्याशिवाय आणि तिला कौल लावल्याशिवाय दादा पाऊल पुढे टाकणार नाहीत, अशी दादांची श्रद्धा होती ! माझी एक वैयक्तिक आठवण मला इथे सांगावीशी वाटते. गोव्याला माझा कार्यक्रम होता. तो संपवून मी परतणार होतो. माझे विमानाचे तिकीट आरक्षित होते. मी विमानतळावर गेलो. तिथल्या गर्दीत दादा भेटले. हातात छोटी बॅग होती. त्यांच्या चेहऱ्यावरून आणि हालचालीवरून ते अत्यंत अस्वस्थ, काळजीत असल्याचे जाणवत होते. मी त्यांना म्हणालो, ” दादा, मुंबईला निघालात का? कसल्या तरी काळजीत आहात का?” दादा खरेच काळजीत होते. त्यांच्याजवळ विमानाचे तिकीट होते- पण ते होते वेटिंग लिस्टवर ! दादांना एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी मुंबईला जायलाच हवे होते. विमानातील सर्व जागा आरक्षित असल्यामुळे ते शक्य नव्हते. दादांची पंचाईतच झाली होती ! मी दादांना म्हणालो, “दादा, आता काय करणार ?” त्याही परिस्थितीत हात जोडून मला म्हणाले, “मंगेशराव, माझी शांतादुर्गा माझ्या पाठीशी उभी आसा. ती माका मुंब्यक नेतली. तुम्ही बघाच !” मी काहीच बोललो नाही. पण मला हसू आले ! मी वेळ झाली तेव्हा विमानात चढलो. थोड्या वेळाने बघतो तर काय ! दादा रेगे विमानात ! उठून त्यांच्यापर्यंत जाणे शक्य नव्हते. काही वेळाने ते दिसले नाहीत- कुठे बसले तेही कळले नाही. मुंबईला उतरलो आणि दादा उतरेपर्यंत थांबलो. दादा उतरले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहात राहिलो ! दादा मिस्किलपणे हसले आणि मला म्हणाले, “मंगेशराव, मी तुमका म्हटल्याप्रमाणे झालां ! माझी शांतादुर्गा माका मुंब्यक घेऊन आयली ! विमानाचा कॅप्टन माझो विद्यार्थी निघालो ! तो माका शेजारी बसवून घेवून आयलो !” शाळेच्या बाबतीत शांतादुर्गाची करूणा भाकण्याची वेळ येऊन ठेपली होती ! पाण्याचे दुर्भिक्ष्य उभे राहिले. जागाच होती मुळात खडकाळ. पण आता शांतादुर्गेला मदतीला घेऊन दादांचे स्वप्न स्वतःला साकार करीत होते. वसतिगृहाच्या बाजूला १८ फुटांवर पाणी लागले ! ३० फूट खोल आणि ३० फूट असलेली प्रचंड विहीर तिथे खोदण्यात आली. आता उभा राहिला खर्चाचा प्रश्न. तोही तोंडचे पाणी पळवणारा होता ! दहा लाख रुपयांचे बजेट होते. पैसे आणणार कुठून? पण याही विहिरीला पाणी लागले. सारस्वत बँकेने व्याजात सवलत देऊन कर्ज मंजूर केले ! दादा मला एकदा गमतीने म्हणाले होते की, शिक्षणक्षेत्रात काम करून ते एक महत्वाची गोष्ट शिकले. कोणती? कर्ज कसे काढावे आणि कर्ज कसे फेडावे ! दादा आयुष्यभर आपल्या शाळांसाठी या ‘शिक्षणाचा’ इमाने इतबारे उपयोग करीत राहिले !
जून १९७० पासून शाळा सुरु करायची होती. प्रारंभी पाचवी ते सातवी हे वर्ग काढावे असे दादांनी ठरविले होते. या ती वर्गांना परवानगी मिळावी यासाठी दादांनी सरकारदरबारी अर्ज केला. दादा गोव्याला शांतादुर्गेच्या देवळात गेले. तिची मनोभावे प्रार्थना केली आणि तिला कौल लावला. देवीने उत्तम कौल दिला. दादा खूष झाले. मुंबईला परत जाईपर्यंत सरकारी परवानगी आलेली असणार याबद्दल त्यांच्या मनात आता जराही संशय नव्हता. दादा मुंबईला आले, परवानगी आलेली नव्हती ! वाट पहात राहिले. अखेर एकदाचे सरकारी पत्र आले. शिक्षणखात्यातल्या अधिकाऱ्याचा कौल शांतादुगेच्या अगदी उलट पडला ! त्याने चक्क परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवले ! शिक्षणखात्यात हा सुपर शांतादुर्गा कोण हे त्यांना कळेना. पण श्रद्धा जबरदस्त. आणि खरेच, चमत्कार झाला. (किंवा दादांनी हुषारीने तो करवला ?)
काही दिवसांनी -अगदी लवकरच -सचिवालयातून या तीनही वर्गांना परवानगी दिल्याचे पत्र दादांना आले !
वीज नसतानाच शॉक
२२ जुंरोजी ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ सुरु होणार. असे दादांनी जाहीर केले. पण १० जूनपर्यंत विजेचा पत्ता नव्हता ! वीजमंडळाकडे पत्र आले. शाळेपर्यंत वीज पोचवण्यासाठी २५ हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून भरणे आवश्यक असल्याचे वीजमंडळांना कळवले. वीज नसूनही दादांना शॉक बसला -कारण एवढे पैसेच नव्हते. दादांची धावपळ सुरु झाली. राजारामबापू पाटील मंत्री होते. दादांनी त्यांनाच कौल लावला !पाटील पावले. खर्चामध्ये सूट देऊन वीजउभारणीचे काम एका आठवड्यात पूर्ण करावे असा आदेश राजारामबापूंनी वीजमंडळाला दिला. अखेर वेळीच विजेचा प्रकाश पडला ! दादा सुखावले !शाळा सुरु झाली. त्या भूमीशी शाळेचे दृढ नाते स्वभावतःच निर्माण झाले होते. कारण तिथलेच दगड वापरून शाळेच्या भिंती उभ्या केल्या होत्या. त्या कठोर वाटणाऱ्या दगडांतून दादांनी आपल्या श्रद्धेच्या हातांनी अखेर विद्यादेवीची सुंदर मूर्ती उभी केली.
रवींद्रनाथांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे संस्कार दादांच्या मनावर झाले होते. पुस्तकांतून ज्ञान घ्यावे, पण पुस्तकांचे कोंडवाडे होऊ नयेत, असे दादांना तीव्रतेने वाटे. या त्यांच्या जाणिवेला आता या खेड्यातील शाळेत वाव होता त्यांच्या जाणिवेला आता या खेड्यातील शाळेत वाव होता. काही काळ पुस्तकातून, वर्गातून बाहेर पडून मुलांनी निसर्गाशी एकरूप व्हावे, कधी झाडाखाली बसून शिकावे. गाणी म्हणावी, शेतात काम करावे. गाई पाळून-त्यांचे संवर्धन करून स्वतः दूध मिळवावे हे दादांनी या शाळेत शक्य केले. त्या उजाड खडकाळ जमिनीत आवश्यक ती मातीची भर घालून दादांनी लहानलहान खाचरे तयार करून घेतली. या खाचरात तऱ्हातऱ्हांचा भाजीपाला मुलांच्या मदतीने तयार होऊ लागला. पेरणी-लावणीपासून कापणीपर्यंत सर्व अवस्थातून काम करीत मुले भाताचे पीक काढू लागली. विद्यानिकेतनाच्या भोवती तऱ्हातऱ्हांची झाडे लावली. या झाडांवर पाखरांच्या शाळा भरू लागल्या. शाळा ही केवळ वर्गांच्या खोल्या असलेली दगडी भिवईची इमारत राहिली नाही ; शाळा ही मुलांसाठी एक सुंदर, निरोगी, अर्थपूर्ण जगणे होऊन राहिली. प्रारंभी दादांनी दोन गायी घेऊन गोसेवा सुरु केली. आज शाळेच्या तेहतीस गायी आहेत. त्यांची देखभाल करण्यात मुले सहकार्य देतात, मुले हौसेने गायींचे दूध काढतात, हे दूध शाळेतल्या मुलांनाच पिण्यासाठी देण्यात येते. दादा आज असते तर शाळेत मुलांना दूध पिताना पाहून त्यांनी तृप्तीची ढेकर दिली असती ! शाळेची एक बैलगाडीही आहे. मुले ती मोठ्या उत्साहाने हाकतात. खरे सांगायचे तर, हे विद्यानिकेतन म्हणजे आनंदनिकेतनच आहे. शाळेचे उदघाट्न करताना, “या संस्थेने शिक्षणक्षेत्रात एक भव्य झेप घेतली आहे, ” असे उद्गार श्री. मधुकरराव चौधरी यांनी काढले होते. ते किती सार्थ होते याचा प्रत्यय या रौप्यमहोत्सवाच्या साक्षीने सर्वांना येतो आहे.
दादांच्या प्रेरणेचा वारसा
दादांचे सुपुत्र डॉ. बाळासाहेब रेगे यांनी शाळेच्या प्रारंभापासून प्राचार्यपद सांभाळले. वडील बंधू डॉ. बापूसाहेब रेगे यांचे त्यांना सतत मार्गदर्शन होते. दादांच्या प्रेरणेचा वारसा घेऊन हे दोघेजण निष्ठेने उभे आहेत. नव्या नव्या प्रकल्पांची स्वप्ने पहात ते उभे आहेत. या शाळेचे खरे भाग्य आहे या शाळेला लाभलेला शिक्षक. ही शाळा वसतिगृहाची आहे. शाळा सुटली की घर होऊन शाळेलाच मुलांचा सांभाळ करावा लागतो आणि म्हणूनच, शिक्षकांना इथे आईवडिलांची भूमिकाही करावी लागते. या सर्व शिक्षकांचा नामोल्लेख करणं इथे शक्य नाही. पण तरीही, दादांचे स्वप्न साकार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, याचा रौप्य-महोत्सवाच्या निमित्ताने कृतज्ञतेने आणि गौरवाने उल्लेख करावासा वाटतो. विद्यानिकेतनचा रौप्यमहोत्सव हा सुंदर, न कोमजणाऱ्या स्वप्नांचा रौप्यमहोत्सव आहे.
| महाराष्ट्र टाइम्स -रविवार ८ जानेवारी १९९५
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे, पुणे ४१० ५०७.
© २०२२ रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन. सर्व हक्क आरक्षित.