दादा

दादांच्या जीवनप्रवासातील पूर्वार्ध प्रवास हा अत्यंत वादळी होता. अशा परिस्थितीत बालमोहनचं स्वप्न सत्यात उतरणं अशक्यप्रायच वाटत होतं. पण निश्चयाचा महामेरू असलेल्या दादांनी आपली वाटचाल नियत मार्गावर चालू ठेवली आणि बालमोहनचं स्वप्न वास्तवात उतरवलंच.

दादा रेगेंविषयी

दादा उर्फ शिवराम दत्तात्रय रेगे आणि बालमोहन शाळा ह्यांची एकरूपता इतकी घट्ट आहे की दादांच्या नसानसांत ‘बालमोहन’ होतं आणि बालमोहनच्या चराचरांत आजही ‘दादा’ आहेत. हे अद्वैत बालमोहनच्या आजवरच्या वाटचालीचं गमक आहे आणि येणारी अनेक दशकं हे अद्वैतच ही संस्था, हा विचार जिवंत ठेवणार आहे, वृद्धिंगत करणार आहे.

‘दादा’ हे वयाने किंवा अधिकाराने आलेलं संबोधन नाही. ते कमालीच्या आत्मीयतेतून आलेलं संबोधन आहे. दादा व्रतस्थ होते. मुलांना उत्तम शिकवायचे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करायचे आणि घासूनपुसून त्यांना आयुष्यासाठी तयार करायचे हे त्यांचं व्रत होते. दादा हे श्रद्धाळू होते, त्यांची देवावर कमालीची श्रद्धा होती आणि ती श्रद्धा त्यांनी अनेकदा पणाला लावली ती विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या हितासाठी. ‘बालमोहन’पलीकडे दादांनी आयुष्यात कशाचाच विचार केला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोचरे गावात १९ मार्च १९०६ रोजी दादांचा जन्म झाला. घरच्यांची इच्छा त्यांनी सरकारी नोकरीत कारकून म्हणून रुजू व्हावं तर दादांची तीव्र इच्छा शिक्षक व्हायची! दादांची इच्छाशक्ती कमालीची होती, त्यामुळे त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली आणि १९ जुलै १९२१ला, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी दादा प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले.

पुढे नातेवाईकांच्या आग्रहाखातर दादा मुंबईला आले, अर्थात शिक्षक म्हणून. ६ सप्टेंबर १९२३ रोजी दादा डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी अँड इंडस्ट्रियल स्कूल म्हणजे लहान मुलांच्या सुधारगृहात शिक्षक म्हणून रुजू झाले. जन्मजात आशावादी असलेले दादा ह्या सुधारगृहात अजिबात निराश झाले नाहीत, उलट त्यांना या सुधारगृहाच्या भिंतीआड नंदनवन फुलवण्याची सुवर्णसंधी दिसली.

अवघ्या चार वर्षात सुधारगृहाची गुणवत्ता सुधारली. चहुबाजुंनी दादांचं कौतुक होऊ लागले. पण कौतुकाच्या या शृंखला दादांना फार काळ अडकवू शकल्या नाहीत आणि त्यांनी त्यांच्या अंतिम स्वप्नाच्या दिशेने झेप घेतली. ती म्हणजे, विद्यार्थीहीत हेच केंद्रस्थानी असलेली स्वतःची शाळा. . . . आणि बालमोहनचा प्रवास सुरु झाला.

दादांवर प्रभाव होता तो महात्मा गांधींचा आणि लोकमान्य टिळकांचा. त्यामुळे बाळ गंगाधर टिळक मधील ‘बाळ’ आणि मोहनदास करमचंद गांधी मधील ‘मोहन’ ह्यातून ‘बालमोहन’ हे शाळेचं नाव त्यांनी निश्चित केले. ३ जून १९४० रोजी बालमोहनच्या आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ‘आनंदयात्रे’ला सुरुवात झाली.

बालमोहनचं सूत्र त्यांनी ठरवलं, “शाळेतील वातावरण आनंदी असायला हवे, मुलांना हसतखेळत शिक्षण दिले पाहिजे आणि कोणताही निर्णय घेताना ‘हा निर्णय मुलांच्या हिताच्या किंवा आनंदाच्या आड येत नाही ना’ हा प्रश्न विचारून घेतला गेला पाहिजे.” आजही या एका सूत्राभोवती बालमोहनचं विश्व गुंफलेले आहे. बालमोहनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दादा म्हणायचे, “बाळांनो, येणाऱ्या कोणत्याही संघर्षाला सामोरे जाणे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मा न विकणे या दोन गोष्टी आपल्या शाळेत नक्कीच मिळतील आणि ह्यापेक्षा अधिक जे काही मिळेल ते या दोन गोष्टींमुळेच मिळेल.”

ग्रामीण आणि शहरी जीवन ह्यांचा योग्य समन्वय साधणारी, निसर्गाच्या कुशीत वसलेली आणि आधुनिक शिक्षणातून निसर्गाकडे बघण्याची दृष्टी विकसित करणारी एक शाळा असायला हवी, ही जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ श्री. रामभाऊ परुळेकर यांची इच्छा होती. ती त्यांनी दादांकडे व्यक्त केली. ही शाळा दादांनीच सुरु करावी असा आग्रहवजा आदेशच भाऊंनी दादांना दिला. पुढे बालमोहनचा कारभार सुरळीत झाल्यावर दादांनी या शाळेचा ध्यास घेतला. शाळेच्या जागेची पाहणी करायला दादांच्यासोबत आचार्य अत्रे होते. २२ जून १९७० रोजी रामभाऊंचं आणि दादांचं स्वप्न तळेगाव येथे ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’च्या रूपात पूर्ण झाले.

दादा अंतर्बाह्य साधे होते आणि ते शेवटपर्यंत साधेच राहीले. १९२१ साली हेदूळ गावी जेव्हा शिक्षक म्हणून दादा रुजू झाले तेव्हाचा त्यांचा पोशाख होता धोतर, सदरा व टोपी आणि हीच शेवटपर्यंत त्यांची ओळख राहिली. त्यांचे विद्यार्थी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांची ‘बाळं’ होती. ही त्यांची बाळंच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली.

बालमोहनच्या प्रवासात अनंत अडचणी आल्या, आर्थिक संकटं शाळेला बघावी लागली, पण या सर्व प्रसंगांत समाजाचा प्रत्येक घटक दादांच्या मदतीला स्वतःहून पुढे येत गेला. बालमोहन जेव्हा आकार घेत होती, तेव्हा त्या मातीच्या गोळ्याला दादांचा आणि अनेकांचा हात लागत होताच पण एक व्यक्ती खंबीरपणे दादांच्या जीवनप्रवासात सर्वार्थाने साथ देत होती. ही व्यक्ती म्हणजे दादांच्या पत्नी गिरिजाबाई म्हणजेच सर्वांच्या ‘काकीबाई’. दादा आणि काकीबाई ह्यांचा संसार ४९ वर्षांचा. दादांच्या आणि बालमोहनच्या प्रत्येक अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देण्याचे व्रतच गिरीजाबाईनी घेतले होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते निभावले.

दादांचे दोन सुपुत्र डॉ. बापूसाहेब रेगे आणि डॉ. बाळासाहेब रेगे ह्यांचा बालमोहनच्या व्यवस्थापनात आणि अध्यापनात मोठा वाटा होता. त्यांच्या दोन सुकन्या कु. सुधा (सौ. मंगला जोशी) आणि कु. सिंधू (सौ. शुभा गिंडे) यांनीही बालमोहनमध्ये अध्यापन करून दादांचा वारसा पुढे चालवला.

शाळांमध्ये थोरामोठ्यांची चरित्रं सांगितली जातात, पण दादांचं व्यक्तिमत्वच असं होतं की ज्यांच्या कथा सांगून मुलांवर संस्कार करायचे तीच माणसं दादांच्या ओढीने शाळेत येत, आजही येतात. १९६२च्या शिक्षकदिनी दादांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तो देखील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि तत्वज्ञ, देशाचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते. आयुष्यभर एकलव्यासारखी साधना केलेल्या दादांचा गौरव अशा ऋषितुल्य व्यक्तीच्या हातून व्हावा ही नियतीची योजना.

राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त अशा आदर्श शिक्षकांनी आपली आत्मचरित्रे लिहिल्यास त्यात त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे प्रतिबिंब पडेल आणि ते नव्या पिढीच्या शिक्षकांना आणि पालकांनाही अनेक दृष्टींनी उपयुक्त ठरेल असं महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने ठरवलं. यासाठी त्यांनी या ‘धडपडणारे शिक्षक’ या उपक्रमाअंतर्गत छापलेल्या पुस्तकमालिकेतलं पहिलं पुस्तक दादांचं आत्मचरित्र ‘माझे जीवन : माझी बाळं’ हेच होतं.

स्वत:पेक्षा संस्था मोठी आहे हे जाणून ३१ मार्च १९५५ रोजी दादांनी स्वकमाईतून साकार केलेल्या शाळेचं व्यवस्थापन ‘बालमोहन विद्यामंदिर ट्रस्ट’ या न्यासाकडे सोपवलं आणि आपलं बालमोहनचं स्वप्न समाजाला सुपूर्द केलं. आजदेखील हा न्यासच शाळेचा कारभार चालवतो.

८ जून १९८२ रोजी दादांचं देहावसान झालं, तरीही आजदेखील बालमोहन हे नाव घेतलं की ती ‘दादांची शाळा’ म्हणूनच ओळखली जाते आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे ‘दादा’ हे आज देखील बालमोहनच्या चराचरात आहेत आणि ते कायम राहतील.

दादा आणि बालमोहन या अद्वैताबद्दल पु. लं. देशपांडे म्हणाले होते, “या शाळेचं नाव ‘बालमोहन विद्यामंदिर’ असं जरी असलं तरी माझ्या तोंडी ‘दादांची शाळा’ असंच आहे. आज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तोंडीही ही दादांची शाळा आहे. ‘दादा’ हे या संदर्भात एका व्यक्तीचे नाव न राहता मुलांविषयीचा जिव्हाळा, वात्सल्य आणि त्याने अगर तिने शहाणे होऊन सुखात आयुष्य काढावं या भावनेला लाभलेलं नाव आहे असं मानायला हवं.”

म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की ‘बालमोहन’ ही दादांची नियती होती आणि ‘दादा’ हे बालमोहनचं वैभव आहे!

शिवराम दत्तात्रय रेगे तथा दादा रेगे

दादांच्या नसानसांत ‘बालमोहन’ होतं आणि बालमोहनच्या चराचरांत आजही ‘दादा’ आहेत. हे अद्वैतच बालमोहनच्या यशस्वी वाटचालीचं गमक आहे.