सर्जनशील विद्यार्थ्यांची, गौरवशाली परंपरा

शाळा ही फक्त विद्येचं केंद्र नाही तर ते संस्कारांचं केंद्र देखील असायला हवं. कारण लहान मूल त्याच्या आयुष्यातला जडणघडणीचा काळ हा शाळेत घालवत असतो आणि त्यामुळे नकळत पण चांगले संस्कार मुलांवर घडावेत ही शाळेची जबाबदारी आहे.

हे किती विस्मयकारी आहे ना ? कालपर्यंत शाळेच्या प्रांगणात बागडणारी मुलं, स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत करत आकाशी झेपावतात आणि यशाला गवसणी घालतात.

बालमोहन विद्यामंदिर ही मुंबई शहरातील सर्वात जुनी आणि प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. हे सर्व क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या विशिष्ट ओळखीचा अभिमान बाळगते. प्राचीन भारताच्या सांस्कृतिक विचारसरणीच्या नियमांमुळे अद्वितीय आणि शिक्षणाकडे स्वत: चे निकष ठरवताना शाळा स्वतःच ठरवलेल्या बांधिलकीचा पुरावा.

आमचा प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी एक समृद्ध अनुभव असतो. त्यांच्यातला चातुर्यपणा असो वा व्रात्यपणा, बहुश्रुतपणा असो वा खेळकरपणा त्या प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात ज्ञानाचा व्रती बनवणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे आणि भविष्यातही असेल. ह्याचमुळे कदाचित आमचा माजी विद्यार्थी यशांगणी बागडताना शाळेशी ऋणानुबंध कायम ठेवतो. आज विविध क्षेत्रात आमच्या संस्थेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यांचं कार्यकर्तृत्व आणि समाजाप्रती योगदान हीच खरी आमच्यासाठी गुरुदक्षिणा ठरते.

आशा भोसले

लोकप्रिय गायिका पद्मविभूषण आशा भोसले बालमोहनच्या माजी विद्यार्थी आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. आशा भोसले म्हणजे सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.

मीना खडीकर

मीना मंगेशकर-खडीकर या मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत.‘मदर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गीत लताबरोबर मीना मंगेशकरांनीही गायले होते.

नीला सत्यनारायण

नीला सत्यनारायण यांच्या सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकऱ्यांचे वडील – शिवसेना-संस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे – यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकऱ्यांकडे आली.आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते.

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.

पूनम महाजन

पूनम महाजन (९ डिसेंबर, इ.स. १९८० – ) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या असलेल्या पूनम ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

प्रिया बापट

प्रिया शरद बापट (जन्म: १८ सप्टेंबर १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली.तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०१८च्या डिसेंबरमध्ये प्रिया बापट हिने नाटक रंभूमीवर निर्माती म्हणून एक नवे पाऊल टाकले.

स्पृहा जोशी

स्पृहा शिरीष जोशी (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती. स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत.