अभिनव समारंभ

भारतीय संस्कृतीत सणांना असाधारण महत्व आहे. मुलांच्या मनावर याचे महत्व बिंबवणं ही विद्यानिकेतन आपली जबाबदारी समजते. काळानुरूप आज घराघरात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी, शाळेत ते पारंपरिक पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग ठेवूनच केले जातात.

बालदिन

मकरसंक्रातीनंतरचा दुसरा दिवस हा विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याचा दिवस. शाळा पतंगांनी आणि पताकांनी सजलेली असते, मुलांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते आणि म्हणूनच तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी म्हणून दिला जाणारा दहावीच्या विद्यार्थिनींना बनविलेला ‘तिळाचा लाडू’ खाऊ म्हणून दिला जातो.

सांस्कृतिक महोत्सव

शालेय शिक्षण आणि त्याबरोबर होणाऱ्या बौद्धिक प्रगतीत हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची नकळत बीजं रोवण्यास कारणीभूत ठरतात. त्यायोगे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पैलू पडतात. विद्यानिकेतनमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील ‘सांस्कृतिक महोत्सव’ आणि प्राथमिक-माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देते.

राष्ट्रीय सण : ध्वजारोहण सोहळा

गुलामगिरीत जखडलेला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ साली संपूर्णतः स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाहीप्रधान संविधान लाभलं हे दोन क्षण विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय सणासारखे साजरे केले जातात. शाळेच्या आवारात ध्वजारोहण केलं जातं, विद्यार्थी संचलन, समूहगायन करतात. मान्यवर मार्गदर्शन करतात आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागवल्या जातात.

गोकुळाष्टमी

आपल्या संस्कृतीत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत श्रीकृष्ण चरित्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात मार्गक्रमण करताना श्री कृष्णाच्या जीवनचरित्राची ओळख होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गोकुळाष्टमीच्या औचित्याने गोकुळातील पारंपरिक वेष परिधान करून विद्यार्थी दहीहंडी फोडतात.. ह्या सण साजरा करताना विद्यार्थ्यांना संघशक्तीचीही प्रचिती येते.

दसरा

दसरा हा तर आजीमाजी विद्यार्थांच्या भेटीचा दिवस. शाळेत सरस्वती पूजन झाले की मग सारेजण एकमेकाना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. माजी विद्यार्थी आवर्जून या दिवशी शाळेला भेट देतात. सारी वास्तू पारंपारिक पोशाखात सजलेल्या आजी माजी विद्यार्थांनी बहरून जातो.

आषाढी एकादशी – दिंडी

महाराष्ट्राला वारकरी परंपरेमुळे विवेकी विचारांचं, मूल्यांचं बीज महाराष्ट्राच्या मनोभूमीवर खोलवर रुजलं आहे. सर्व वारकरी संतांच्या अभंगाच्या गजरात, टाळ-मृदूंगाच्या गजरात संतांच्या पालखीसह एकत्रित मार्गस्थ होतात. ही फक्त अध्यात्मिक यात्रा नसते तर प्रेमभाव, आपुलकीने, एकाच ध्येयाने जगण्याचा मार्ग असतो, ह्याचीच विद्यार्थ्यांना प्रचिती यावी म्हणून विद्यानिकेतनमध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते.

कला-विज्ञान प्रदर्शन

विद्यार्थ्यांमधील हस्तकला, चित्रकला, शिल्पकला वृद्धिंगत व्हावी तसंच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी ह्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलाकृती व प्रयोग ह्यांना प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळणं नितांत आवश्यक असतं आणि विद्यानिकेतनमध्ये अशी सुसज्ज कला-विज्ञान प्रदर्शने आवर्जून भरवली जातात.

क्रीडा

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनला स्वतःच विस्तीर्ण मैदान आहे. इथे खोखो, कबड्डी ते व्हॉलीबॉल, क्रिकेट पर्यंत सर्व खेळ खेळण्याची सोय आहेच पण शाळा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देते आणि सुविधा देखील उपलब्ध करून देते.