दीपस्तंभ – दादा
दादा
‘दादा’ हे वयाने किंवा अधिकाराने आलेलं संबोधन नाही. ते कमालीच्या आत्मीयतेतून आलेलं संबोधन आहे. दादा व्रतस्थ होते. मुलांना उत्तम शिकवायचे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करायचे आणि घासूनपुसून त्यांना आयुष्यासाठी तयार करायचे हे त्यांचं व्रत होते. दादा हे श्रद्धाळू होते, त्यांची देवावर कमालीची श्रद्धा होती आणि ती श्रद्धा त्यांनी अनेकदा पणाला लावली ती विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या हितासाठी. ‘बालमोहन’परिवारातील शाळांच्या पलीकडे दादांनी आयुष्यात कशाचाच विचार केला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोचरे गावात १९ मार्च १९०६ रोजी दादांचा जन्म झाला. घरच्यांची इच्छा त्यांनी सरकारी नोकरीत कारकून म्हणून रुजू व्हावं तर दादांची तीव्र इच्छा शिक्षक व्हायची! दादांची इच्छाशक्ती कमालीची होती, त्यामुळे त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली आणि १९ जुलै १९२१ला, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी दादा प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले.
अवघ्या चार वर्षात सुधारगृहाची गुणवत्ता सुधारली. चहुबाजुंनी दादांचं कौतुक होऊ लागले. पण कौतुकाच्या या शृंखला दादांना फार काळ अडकवू शकल्या नाहीत आणि त्यांनी त्यांच्या अंतिम स्वप्नाच्या दिशेने झेप घेतली. ती म्हणजे, विद्यार्थीहीत हेच केंद्रस्थानी असलेली स्वतःची शाळा. . . . आणि बालमोहनचा प्रवास सुरु झाला.
बालमोहनच्या प्रवासात अनंत अडचणी आल्या, आर्थिक संकटं शाळेला बघावी लागली, पण या सर्व प्रसंगांत समाजाचा प्रत्येक घटक दादांच्या मदतीला स्वतःहून पुढे येत गेला. बालमोहन जेव्हा आकार घेत होती, तेव्हा त्या मातीच्या गोळ्याला दादांचा आणि अनेकांचा हात लागत होताच पण एक व्यक्ती खंबीरपणे दादांच्या जीवनप्रवासात सर्वार्थाने साथ देत होती. ही व्यक्ती म्हणजे दादांच्या पत्नी गिरिजाबाई म्हणजेच सर्वांच्या ‘काकीबाई’. दादा आणि काकीबाई ह्यांचा संसार ४९ वर्षांचा. दादांच्या आणि बालमोहनच्या प्रत्येक अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देण्याचे व्रतच गिरीजाबाईनी घेतले होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते निभावले.
८ जून १९८२ रोजी दादांचं देहावसान झालं, तरीही आजदेखील बालमोहन असो की ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ शाळा असो ही नावं घेतलं की ती ‘दादांच्या शाळा’ म्हणूनच ओळखल्या जातात. आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे ‘दादा’ हे आज देखील बालमोहनच्या चराचरात आहेत आणि ते कायम राहतील.
म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की ‘बालमोहन’ ही दादांची नियती होती आणि ‘दादा’ हे बालमोहनचं वैभव आहे!
“एक साकार स्वप्न” – दादा
१९६७ साली आचार्य अत्रे व मॅजिस्ट्रेट श्रीखंडे यांच्याबरोबर तळेगावी महाविद्यालयासाठी जागा पाहण्याकरिता मी त्यांच्या विनंतीवरून गेलो होतो. तेथे माझा एक माजी विद्यार्थी विवेक क्षीरसागर मला भेटला. महाविद्यालयाची जागा त्याने मला दाखवली आणि मला सुचवले, दादा या बाजुच्या जागेमध्ये बालमोहनची शाखा काढा. आचार्य अत्रे यांनीही या सूचनेला लगेच दुजोरा दिला.
माझ्या मनात रामभाऊंचे स्मारक करावे अशी तीव्र इच्छा होती. ती आचार्य अत्रे याना मी बोलून दाखवली. त्याबरोबर आचार्य अत्रे यांनी मला जवळ घेत म्हटले की, दादा, रामभाऊंचे स्मारक कराल तुम्हीच. त्यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञाचे स्मारक खेडेगावात होणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य अत्रे यांचे हे उस्फुर्त आशीर्वादच होते.
माझा आणखी एक जुना विद्यार्थी शशिकांत नाडकर्णी याला मी लगेच मुंबईत भेटलो. तो इंजिनिअर आहे. त्याच्याशी प्रारंभिक बोलणी केली. प्लान्स निश्चित केले व तळेगाव नगरपालिकेला सादर केले.
वसतिगृहयुक्त शाळा म्हणजे कमीत कमी दोन इमारतींची आवश्यकता होती. त्यांपैकी शालागृहाची इमारत बारा खोल्यांची बांधावी असं ठरविले. प्रवेशद्वार मुंबईच्या शाळेप्रमाणे आकर्षक करायचे ठरवले. प्रत्येक वर्गाच्या समोर त्या वर्गाला बागकामासाठी मोकळी जागा राखून ठेवली. इमारत बैठीच असावी आणि वर काँक्रीटचे उतरते छप्पर असावे अशी योजना केली. वसतिगृह दोन मजली बांधण्याचे ठरवले. तळमजल्यावर चार कोपऱ्यात चार मोठे हॉल्स. तळेगावला पाण्याचे दुर्भिक्ष्य, पण योगायोगाने वसतिगृहाच्या खालच्या बाजूस झरा लागला. तेथे १८ फुटांवर पाणी लागले. त्यामुळे ३० फूट खोल व ३० फूट व्यासाची भव्य विहीर तेथे खोदली.
जून १९७० पासून पाची ते सातवीचे वर्ग काढावे असे मी ठरविले आणि डिसेंबर १९६९ च्या सुमारास या तीन वर्गांच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्ज केला. माझ्या अर्जाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन हे तीनही वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली.
त्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये शिक्षकांसाठी जाहिरात दिली आणि मी श्री. वसंत भा. परुळकर आणि श्री. र.स. गायतोंडे यांच्या सल्ल्याने शिक्षकांची निवड केली. माझा मुलगा चि. श्रीपाद उर्फ बाळ याला बालमोहन विद्यामंदिरमध्ये बारा वर्षांचा शिक्षकी पेशाचा अनुभव मिळाला होता. म्हणून त्याची रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनात प्रमुख म्हणून नेमणूक करण्याचे विश्वस्त मंडळाने निश्चित केले.
एकीकडे इमारतीचे बांधकाम चालू होते. दुसरीकडे फ़र्निचिरचे काम जोरात चालू होते व तिसरीकडे शैक्षणिक वातावरण विद्यानिकेतनात कसे निर्माण करता येईल यासंबंधीच्या सभा एकामागून एक भराभर होत होत्या. इकडे काँट्रॅक्टरचा पैशासाठी तगादा, तर काही वेळेला ‘माल संपला, पुढं काय?’ अशा अनेक समस्या आ वासून माझ्यापुढे उभ्या होत्या. पण या समस्यांतून विविध तऱ्हेने मार्ग काढण्यासाठी मला माझ्या माजी विद्यार्थ्यांचे जे सहाय्य मिळाले, त्यामुळेच हे विद्यानिकेतन २२ जून १९७० रोजी ९२ मुलांनीही सुरु करता आले.
शाळेची सुरुवात एका छोट्याशा समारंभाने झाली. तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. नथूभाऊ भेगडेपाटील यांच्या शुभहस्ते शाळा सुरु झाली. गावातील मुले म्हणजे शेतकऱ्यांची मुले होती. त्यांच्या सहाय्याने शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील जागा भुईमूग लावून, विविध रोपटी लावून सुशोभित केली. वर्गामध्ये शैक्षणिक वातावरणाला उपयुक्त अशा म्हणी, टाकते, चित्रे लावली आणि शाळा सुंदर, रचनात्मक मांडणीने शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहाने सुरु केली.
५ ऑक्टोबर १९७० रोजी शाळेचे पहिले इन्स्पेक्शन झाले. त्यावेळी शिक्षणखात्याचे अधिकारी श्री. पी. के. देशमुख आले होते. शाळेतील शैक्षणिक वातावरण, मुलांचे आनंदी व हसरे चेहरे, शाळेतील शिक्षण साहित्य व इतर शैक्षणिक सुविधा यांबद्दल त्यांनी शाळेची वाखाणणी केली आणि त्यानंतर १० ऑक्टोबर १९७० रोजी, ललितापंचमीच्या दिवशी, विद्यानिकेतनला शासनाची मान्यता मिळाली.
विद्यानिकेतनचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे शिक्षणमंत्री श्री. मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते १२ ऑक्टोबर रोजी झाले. या समारंभात मुलांनी दर्जेदार मनोरंजक कार्यक्रम सादर केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. चौधरी यांनी ” या संस्थेने शिक्षणक्षेत्रात भव्य झेप घेतली आहे” असे गौरवोद्गार काढले.
विद्यानिकेतनच्या परिसरात वड, पिंपळ, निलगिरी, अशोक, इत्यादी झाडे लावून सर्व परिसर वनश्रीने नटवलेला आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांच्या किलबिलाट नेहमी चालू असतो.
माझी गुरे राखण्याची हौस वृद्धापकाळीही मनसोक्तपणे भागवावी असे माझ्या मनात आले. मुंबई येथील आरे कॉलनीमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने चार जर्सी गायी विकत घेतल्या. चेंबूरच्या पांजरपोळातून ‘गीर’ जातीच्या चार चांगल्या गाई आणल्या. या गुरांसाठी थोडक्या खर्चात गोठा तयार केला. या गुरांची देखभाल करण्यासाठी विद्यानिकेतनातील एक-दोन सेवकांना प्रशिक्षण देऊन आणले. आज या गोठ्यात गाई व बैल मिळून ३५ गुरे आहेत. या गोशाळेतील गाई दर दिवशी सुमारे ७० लिटर दूध देतात. आमच्या मुलांना दूध व दुभत्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात.
गोशाळेजवळ विद्यानिकेतनने पाचशे चौरस फुटांचा गोबरगॅस प्लान्ट १९७९ साली उभारला. म्हणूनच वसतिगृहास लागणाऱ्या वीज व जळण (गॅस) यांच्या खर्चात आज बचत होत आहे. तसेच शेतीसाठी याच प्लान्टमध्ये उपयोगात आणलेल्या शेणाचा खत म्हणून उपयोग करता येतो.
दिवसेंदिवस विद्यानिकेतनचा दर्जा वाढत आहे. हुशार विद्यार्थ्यांचा या वसतिगृहयुक्त विद्यानिकेतनात होईल अशी खात्री झाल्यामुळे भारत सरकार १९७५ सालापासून दरवर्षी सुमारे १५ हुशार विद्यार्थी वसतिगृहात पाठवत आहे. महाराष्ट्रातील एक दर्जेदार व कार्यक्षम शाळा म्हणून महाराष्ट्र शासनाने १०,००० रुपयांचे खास प्रोत्साहनार्थ अनुदान या विद्यानिकेतनाला दिले आहे. तसेच १९७४ साली महाराष्ट्राचे शिक्षण व वनमंत्री श्री. मधुकरराव चौधरी यांनी तळेगाव परिसरातील एक डोंगर झडे लावण्यासाठी वहिवाटीसाठी विद्यानिकेतनला एका समारंभाने बहाल केला. विद्यानिकेतनची मुले दरसाल येथे वनमहोत्सव साजरा करतात. हे विद्यानिकेतन चर्चासत्रे, शैक्षणिक शिबिरे यांचे एक केंद्रच बनले आहे. शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ व नामवंत व्यक्ती यांच्या भेटी हा एक नित्यक्रमाचा भाग झालेला आहे.
बालमोहन विद्यामंदिर आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन यांमधील शिक्षक व शाळाप्रमुख एकमेकांच्या विचाराने आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती साधीत असतात. मी मधूनमधून जेव्हा तळेगावला जातो तेव्हा हा समन्वय पाहून मला अतिशय समाधान वाटते.