शाळेच्या स्थापनेचा इतिहास

शालेय शिक्षण कसं असावं ह्याची जणू राज्यघटना दादांनी शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस लिहिली. त्याचंच एक प्रगत पाऊल म्हणजे १९७० साली स्थापन केलेली तळेगावस्थित, निसर्गाच्या सानिध्यातील ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’.

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन

बालमोहन विद्यामंदिर आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन ह्या दोन्ही संस्था ह्या दादांच्या समर्पण आणि कृतज्ञता ह्या दोन अस्सल गुणांचं प्रतीक आहे. बालमोहनच्या उभारणीच्या समरप्रसंगांमध्ये दादांच्या पाठीशी जे अनेक आशीर्वादाचे, पाठिंब्याचे आणि विश्वासाचे हात उभे राहिले त्यातला एक महत्वाचा हात स्व. रामभाऊ परुळेकर ह्यांचा होता. ‘बालमोहन’ शाळेचं उदघाट्नच रामभाऊंच्या हस्ते झालं होतं, लौकिकार्थाने रामभाऊ दादांचे गुरु. आपल्या गुरूच्याबद्दल दादांच्या मनात कमालीची कृतज्ञतेची भावना होती. बालमोहन हा जसा विचार आहे तसा एक वेगळा विचार रुजवणारी एक शाळा गुरूंच्या स्मरणार्थ उभारावी ही दादांची इच्छा. गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या पेक्षा उत्तम मार्ग कोणता असणार?

दादांनी ही इच्छा बोलून दाखवली दस्तरखुद्द प्रल्हाद केशव अत्रेंना. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कालावधीत महाराष्ट्राला दिशा दाखवणारे ‘आचार्य’च ते. अत्रेंवर सरस्वती कमालीची प्रसन्न होती आणि जणू ती सरस्वतीच त्यांच्या मुखातून ‘तथास्तु’ म्हणाली. आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनची स्थापना झाली.

‘बालमोहन’ हा जशी एक फक्त वास्तू नाही तर तो जसा विचार आहे तसाच रामभाऊ परुळेकर हा पण एक विचार असावा आणि तो कितीही अडचणी आल्या तरी रुजावा ही दादांची तळमळ होती. रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे संस्कार दादांच्या मनावर होतेच. आणि त्या दृष्टिकोनाचे एक प्रतीक म्हणजे ‘शांतिनिकेतन’ त्याचा प्रभाव दादांच्या विचारांवर असणं हे स्वाभाविक होतं. थोडक्यात दादांना मोकळ्या वातावरणात, भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा, विस्तीर्ण पटांगण आणि निसर्गाच्या जितक्या समीप राहून मुलांना शिक्षण देता येईल ते द्यायचं होतं. ही शाळा दादांसाठी प्रयोगभूमीच होती. शिक्षण तेच पण ते जितकं कार्यानुभवातून, मातीत हात घालून आणि निसर्गाची रूपं न्याहाळत देता येईल ते त्यांना द्यायचं होतं. त्यावेळच्या ग्रामीण शाळांमध्ये आणि शहरी शाळांमध्ये जी तफावत होती ती भरून काढणारी शाळा म्हणजे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन.

आज जरी तळेगाव हे मुंबई-पुण्यापासून जवळ वाटत असलं तरी १९६० च्या दशकात ते खेडेगावंच होतं. १० एकर खडकाळ माळरान, झाड सोडा पण हिरवं रोपटं पण क्वचित दिसतंय, आणि मुख्य म्हणजे पाणी कधीच लागणार नाही असं वाटावं अशा एका वैराण जमिनीवर दादांनी ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतचं रोपटं लावलं. अशा जमिनीवर दादांनी नंदनवन फुलवलं. तळेगाव आणि आसपासच्या परिसरातील सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत आल्यावर पुस्तकांच्या कोंडवाड्यात आलो आहोत अशी भावना निर्माण होऊन त्यांनी शिक्षण अर्धवट सोडू नये ही दादांची इच्छा. त्यामुळे शाळेच्या वातवरणात कुठेही कृत्रिमता येणार नाही हे त्यांनी कटाक्षाने पाहिलं.

२२ जून १९७० ला ९२ विद्यार्थ्यांचा पट घेऊन ही शाळा सुरु केली. वड,पिंपळ, अशोक, निलगिरीसारख्या वृक्षांनी बहरलेल्या परिसरात आज ही शाळा उभी आहे. दादांचे सुपुत्र श्री. शी. रेगे अर्थात आपल्या सगळयांना ‘बाळ’सर म्हणून परिचित ह्यांनी दादांच्या सांगण्यावरून स्वतःच आख्खं आयुष्य ह्या शाळेला वाहून टाकलं. प्रचलित शिक्षणाच्या जोडीलाच मूर्तिकला,कुंभारकाम ते थेट छायचित्रकला शिकवणारी हे एकमेवाद्वितीय शाळा दादांनी उभी करून दाखवली. ज्या इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्या इंद्रायणी काठी आणि भक्तिपंथाचा कळस ज्यांनी रचला त्या तुकोबारायांच्या देहूपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दादांनी ज्ञानाचा जणू मळाच फुलवला.