शाळा नव्हे प्रयोगशाळा

कृत्रिमतचा स्पर्श ही नसलेली, निसर्गाच्या सानिध्यात, कार्यानुभवातून शिक्षण देणारी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन ही फक्त एक शाळा नव्हे तर एक ‘प्रयोगशाळा’.
१९७० साली तळेगाव आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत आणायचं असेल तर ती मुलं ज्या वातावरणात वाढली आहेत तसं वातावरण शाळेत आणि त्याच्या परिसरात असायला हवं. त्यात कुठेही कृत्रिमता असू नये, ह्या मुलांना जशी मोकळ्या वातावरणात वावरायची सवय असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ज्या निसर्गाच्या सानिध्यात जगत आलेले आहेत ते वातावरण त्यांना उपलब्ध करून देणं हा विचार ह्या शाळेच्या केंद्रस्थानी होता आणि आहे.
म्हणूनच ह्या खडकाळ जागेत दादांच्या सांगण्यावरून बाळ सरांनी असंख्य झाडं लावली, गोशाळा उभारली, काही काळ शाळेच्या आवारात शेती केली, जेणेकरून मुलांना शाळा आपलीशी वाटेल. ७० च्या दशकांत हे दुर्मिळ होतं पण आवश्यक होतं. रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन मध्ये हा विचार करून वरील सर्व रचना केली गेली. मुलांना कार्यानुभवातून आणि त्यांच्याकडे जन्मजात असलेल्या निसर्ग निरीक्षणाच्या कौशल्याच्या सहाय्याने प्रचलित शिक्षण दिलं. शाळेत असताना प्रचलित पाठयपुस्तकातील शिक्षण तर उत्तम पद्धतीने दिलंच पण शाळा सुटल्यावर बाहेरच्या स्पर्धेच्या जगात ही मुलं भांबवणार नाहीत ह्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयोग/प्रयत्न इथे केले गेले. म्हणून ही फक्त शाळा नाही तर विद्यार्थी घडवणारी ‘प्रयोगशाळा’ देखील.