सहयात्री

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या स्थापनेला १९९५ साली २५ वर्ष पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या वेळेस एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलं. त्यात शाळेच्या २५ वर्षांच्या प्रवासाविषयी विद्यानिकेतनेचे त्यावेळचे प्रमुख आणि विश्वस्त आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या प्रवासात दादांचे सहयात्री म्हणून ठाम उभे राहिलेले डॉ. श्रीपाद शिवराम रेगे म्हणजेच बाळसर ह्यांचा एक लेख ह्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाला होता. तो पुनर्प्रकाशित करत आहोत.

डॉ. श्रीपाद शिवराम रेगे म्हणजेच बाळ सर
डॉ. बाळासाहेब रेगे

डॉ. श्रीपाद शिवराम रेगे उर्फ डॉ. बाळासाहेब रेगे हे दादासाहेबांचे द्वितीय चिरंजीव. दादांचे गुरू व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणशास्त्रज्ञ कै. डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ परुळेकर यांचं ग्रामीण व शहरी जीवनाचा संगम साधणारं शिक्षण मुलांना द्यावं हे स्वप्न. ते स्वप्न साकार करण्याच्या भावनेने दादांनी दि. २२ जून १९७० रोजी त्यांच्याच नावाने ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ ही वसतीगृहयुक्त शाळा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे स्थापन केली आणि मोठ्या विश्वासाने ती बाळासाहेबांच्या हाती सुपूर्द केली.

डॉ. बाळासाहेब रेगे हे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या त्यांच्याच घरातल्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ मध्ये झाले. डॉ.बाळासाहेबांनाही सर्वजण ‘बाळसर’ या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या नावाने संबोधत असत. बाळसरांच्या घरात त्यांच्या लहानपणापासून घरी सतत येणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील उपक्रमांविषयी दादांशी चर्चा करीत असत त्यामुळे बाळसरांवर कळत नकळत संस्कार होत गेले. एस.एस.सी झाल्यावर कॉलेज सुरू असतानाच ते शाळेतील शैक्षणिक वातावरणामुळे आणि दादांच्या सहवासामुळे शिक्षकी पेशाकडे ओढले गेले. बालमोहनचे व्यवस्थापन, मुलांच्या सहली, खेळ, दिनविशेष, जनसंख्या संपर्क, पालकांशी हितगुज यामध्ये बाळसर दिवसभर गढून जात असत. १९६१ साली बी. एड. झाल्यानंतर जवळजवळ बारा वर्षे बालमोहन विद्यामंदिर येथे त्यांनी दर्जेदार तज्ञ विषयशिक्षकांच्या सानिध्यात अध्यापनाचे कार्य केलेले असल्यामुळे तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनमध्ये सुरुवातीपासूनच शाळेचे मुख्याध्यापक व वसतीगृहप्रमुख म्हणून दादांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पेलू शकले.

दादांनी बाळासाहेबांमधील नेतृत्वगुण, परोपकारी वृत्ती, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, प्रसंगी कठोरता हे सर्व गुण हेरूनच त्यांच्या हातात विश्वासाने ही शाळा दिली व दादांच्या विश्वासाला शिरसावंद्य मानून समर्थपणे त्यांनी शाळा व वसतिगृह एका उंचीवर नेऊन ठेवले .या सर्व घडामोडींमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती श्रीलेखा रेगे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. दादांचं स्वप्न साकार करण्याचं शिवधनुष्य समर्थपणे उचलताना बाळसरांनी अथक मेहनत केली. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समर्पित शिक्षकांची फळी उभी केली. त्यांच्याच पुढाकाराने या शाळेमध्ये अभ्यासक्रमानुवर्ती व अभ्यासेतर असे अनेक उपक्रम सुरु झाले, जे आजवर राबवले जातात. त्यामध्ये आषाढी एकादशी, दिंडी, बालदिन ,मातृदिन, तज्ञ मार्गदर्शकांद्वारे घेतली जाणारी शिबिरे ,गोकुळाष्टमी यासारखे संस्कार देणारे कार्यक्रम हस्ताक्षर, चित्रकला, नाट्य, गायन इत्यादी विद्यार्थ्यांमधील विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे..

प्रामुख्याने शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांचा समन्वय होऊन विचारांची व संस्कृतीची देवाण-घेवाण होऊन त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हाही या वसतीगृह निर्मितीमध्ये हेतू होता व तो बऱ्याच अंशी सफलही झाला. या सर्व गोष्टींची शासनाने नोंद घेऊन डॉ. बाळासाहेब रेगे यांना ५ सप्टेंबर १९८८ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री शरद पवार यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान केला पण बाळसरांसाठी त्यांच्या विदयार्थ्यांच्या मनातलं प्रेम आणि आदर हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. त्याच वर्षी म्हणजे १९८८ साली बाळसरांना संस्कृत विषयात डॉक्टरेट (Ph.D) मिळाली.

तळेगावच्या माळरानावर शहरी आणि ग्रामीण जीवनाचा योग्य संगम साधून भारताचा उद्याचा सुजाण नागरिक घडवायचं व्रत बाळसरांनी आयुष्यभर घेतलं. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे घर सोडून वसतिगृहात शिकायला आलेल्या शेकडो मुलांचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं. त्यांच्यावर आईच्या मायेची पारख घालतानाच त्यांना वडिलांच्या शिस्तीचा संस्कार द्यायलाही बाळसर विसरले नाहीत. म्हणूनच आजही आपापल्या आयुष्यात यशस्वी झालेली मुलं केवळ आपल्या शाळेचं किंवा वसतिगृहाच्या आठवणींनी हळवी होतात. आपल्या यशाचं श्रेय आपल्या आई-वडिलांच्या इतकंच बाळसरांना देखील देतात.

अशा रीतीने आपले संपूर्ण जीवन शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना समर्पित करून दि. ७ मे २०१० रोजी बाळसर अनंतात विलीन झाले. बाळसरांना देवाज्ञा झाली तेव्हा ते बालमोहनचे कार्यकारी विश्वस्त होते. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतःचे देहदानही त्यांनी केले आणि स्वतःचा देह सोडल्यानंतरही ते विद्यार्थ्यांचेच राहिले.

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या स्थापनेला १९९५ साली २५ वर्ष पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या वेळेस एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलं. ह्या स्मरणिकेसाठी बाळसरांनी ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’च्या २५ वर्षांच्या वाटचालीच्या स्वानुभवाचा लेखाजोखा ह्या लेखात मांडला. तो लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहोत.

माझे हृद्यगत" – श्रीपाद शिवराम रेगे

 

आज दादा हवे होते. आजचे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनचे वैभव पाहून त्यांना अतिशय आनंद झाला असता. १९७० साली सुरु केलेल्या रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन ह्या वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळेचा रौप्य्महोत्सव १९९५ साली साजरा होत आहे. ह्या कल्पनेनेच दादांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले असते आणि त्यांनी आम्हाला खूप धन्यवाद दिले असते.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणशास्त्रज्ञ कै. रामचंद्र विठ्ठल उर्फ रामभाऊ परुळेकर ह्यांचे स्मारक करून त्यांचे शैक्षणिक ऋण अंशतः तरी फिटले जावे या कृतज्ञतेच्या भावनेने आणि त्यांच्याशी १९६१ साळापूर्वी झालेल्या गप्पांत दादांना भावलेली त्यांची अपुरी शैक्षणिक स्वप्ने साकार करण्याच्या भावनेने हे विद्यानिकेतन दादांनी संस्थेतर्फे २२ जून १९७० रोजी स्थापन केले.

२५ वर्षांपूर्वी लावलेल्या ह्या रोपट्याचा विशाल वृक्ष झालेला पाहून रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनाचा परिवार आणि त्याचे हितचिंतक यांना अतिशय आनंद वाटत असणार.

सुरुवातीपासूनच मुख्यह्दयंपाक व विद्यानिकेतन प्रमुख म्हणून मी केलेले काम, खरे म्हटले तर, सुरुवातीला माझ्या आवाक्याबाहेरचे होते. केवळ बालमोहन विद्यानंदिरातील शिक्षक म्हणून १२ वर्षे अनुभव घेतलेला मी. शहरी वातावरणातील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून माझे अनुभवविश्व विस्तारित जात असलेला मी, ज्यावेळी दादांच्या आदेशानुसार ही जबाबदारी पत्करली, तेंव्हा मोठ्या जिद्दीने दादांचे स्वप्न साकार करण्याचे मनाशी ठरवले आणि मुंबईहून तळेगावला आलो. प्रथमतः मी मुंबईच्या वातावरणाची आठवण येऊन अस्वस्थ होत असे. परंतु तळेगावच्या वातावरणात रममाण होण्यात मला जर कोणी मदत केली असेल, तर वसतिगृहात आलेल्या बालचमूंनी आणि दादांवर, शाळेवर आणि शिक्षणावर निरतिशय निष्ठा असलेल्या तळेगावकरांनी. विद्यानिकेतन सुरु करण्यापूर्वी दादांना मी म्हटले, की आपण प्रथम निवासी शाळा पाहिल्या आणि तेथील सुविधांचा विचार केला, तर आपणाला मुलांना योग्य वातावरण देणारे वसतिगृह चांगल्यारीतीने चालवता येईल. त्यानंतरचे दादांचे शब्द मी कधीही विसरणार नाही. “बाळ, आपणास मूल ओळखता येईल. प्रथम तुझ्या दृष्टिकोनातून वसतिगृहयुक्त शाळेला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तू लिहून काढ. आपल्याला शिक्षक कोणत्या मनोवृत्तीचे पाहिजेत, चोवीस तास मूल गुंतण्यासाठी कोणकोणते उपक्रम कार्यान्वित करता येतील, या संबधीची तुझ्या मनातील टिपणे कर आणि मगच आपण दुसऱ्या वस्तिगृहयुक्त शाळा पाहू.” दादांच्या ह्या बोलण्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी कामाला लागलो. आज मला सांगायला आनंद वाटतो की, मी ह्या विद्यानिकेतनचा विकास करण्यात पुष्कळ अंशी यशस्वी झालो आहे.

मी धडपडणारा, स्वतःला झोकून देऊन कार्य करीत राहणारा बालकांचा सेवक आहे. आजपर्यंत या विद्यानिकेतनात अनेक शिक्क्षणिक नवीन उपक्रम सुरू करताना आणि ते यशस्वी झाले की त्यावेळी दादांची मला नेहमी अजून आठवण होते.

मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मला माझ्यावर निरतिशय प्रेम करणारा विद्यार्थीगण भेटला आहे. तसेच विद्यानिकेतनातील छोट्यांना खुलवणारे, हसवणारे, विकसवणारे, विद्यानिकेतनशी एकरूप झालेले सहकारी मला लाभले आहेत. माझ्या वृत्ती-मनोवृत्ती ओळखून माझ्या मनाला उत्तेजन देणारी तळेगावकर मंडळी मला भेटली आहेत. मला पदोपदी साहाय्य करणारे पुणे-लोणावळा परिसरातील कित्येक शिक्षणतज्ज्ञ मला भेटले. एव्हढेच नव्हे मला सतत योग्य मार्गदर्शन करणारे शासनस्वरूपी शिक्षणखातेही भेटले. ह्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. काही वेळेला अपयशही माझ्या पदरी आले आहे. पण ह्या अपयशाने मला यशाची पायरी चढायला लावली आहे. मला दररोज निरनिराळ्या स्वभावाची मुले भेटतात. माणसे भेटतात आणि त्यांचे स्वभाव ओळखून त्यांना समाधान देण्यात माझा दिवसाचा वेळ निघून जातो ते कळतच नाही.

ह्या विद्यानिकेतनातील वसतिगृहामध्ये २५ वर्षांपूर्वी ३२ विद्यार्थी होते. आज १९३ विद्यार्थी वसतिगृहातील उत्साहवर्धक वातावरणात आनंदाने स्वतःचा विकास साधीत आहेत.

आज मला ह्या वसतिगृहातील वातावरणाला सर्वांगाने आकार देणाऱ्या सौ. विजयाताई फेणाणी ह्यांची आठवण होत आहे. वसतिगृहाच्या उभारणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या मनमिळाऊ आणि सौजन्यपूर्ण स्वभावाने सर्वाना आपलेसे केले. त्यांनी अखेरपर्यंत विद्यानिकेतनामध्ये मुलांची आणि कर्मचाऱ्यांची मनोभावे सेवा केली. गेल्यावर्षी (दि. २५/०७/१९९४ रोजी ) त्या अल्पशा दुर्धर आजाराने दिवंगत झाल्या. आम्हा सर्वाना अतिशय दुःख झाले. वसतिगृहाच्या वातावरणात एकप्रकराची पोकळी निर्माण झाली होती. परंतु वसतिगृहाची जबाबदारी पत्करण्यास माझी पत्नी सौ. श्रीलेखा पुढे आली आणि मी निश्चिंत झालो.

येथे एक महत्वाची गोष्ट मला नमूद केली पाहिजे. ह्या रौप्यमहोत्सवी वर्षी सौ. फेणाणी ह्यांची मावसबहीण सौ. सुमित्रा रेगे ह्यांनी सौ. विजयाताईंच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी कल्याणनिधी निर्माण करण्याकरिता दोन लाख रुपयांची रक्कम संस्थेला देणगीच्या स्वरूपात दिली हे येथे कृतज्ञतेच्या भावनेने सांगितले पाहिजे. आज विजयाताई फेणाणी यांची आम्हा सर्वाना फार आठवण येत आहे.

विद्यानिकेतनातील विद्यार्थीवर्गाचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता मला माझ्या शिक्षकसहकाऱ्यांनी सक्रिय सहकार्य दिलेले आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून शाळेचा दर्जा उंचावण्यास साहाय्य करणाऱ्या शिक्षकांना मी विसरू शकणार नाही. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ज्या अनुभवी तपस्व्यांचं मार्गदर्शन लाभले त्या शी. बा. ना. रुद्रे आणि कै. रा.स. उपाध्ये ह्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. इ. ५ वी ते १० वी या वर्गांचे निकाल पाहिल्यावर असे लक्षात येईल की शालान्त परीक्षेच्या वर्गात जाईपर्यंत प्रत्येक वर्गाचा निकाल जवळ जवळ १००% लागूनही शालान्त परीक्षेचा निकाल जास्तीत जास्त ९० टक्क्यांपर्यंत गेला आहे हे येथे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

येथे मला कृतज्ञतेच्या भावनेने एक गोष्ट नमूद केली पाहिजे. मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरात अनेक अनुभवी व कलावंत शिक्षकांनी वेळोवेळी ह्या विद्यानिकेतनातील शिक्षकवर्गाला आणि विद्यार्थ्यांना अत्यंत जिव्हाळ्याने व आपुलकीने अभ्यासक्रम, अभ्यासक्रमानुवर्ती चळवळी, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम, इत्यादी बाबतीत मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे व करित आहेत आणि म्हणूनच आम्ही शिक्षण विकासाच्या क्षेत्रात यश मिळवू शकलो आहोत. त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच होतील.

ह्या विद्यानिकेतनच्या व्यवस्थापनात पुण्याचे कै. चिंतामण हेरंब देव ह्यांचे मला लाभलेले साहाय्य व मार्गदर्शन मी कधीही विसरणे शक्य नाही.

तसेच, विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी वेळोवेळी विद्यानिकेतनाच्या प्रगतीच्या बाबतीत जे आपुलकीने साहाय्य केले आहे ते मी कधीही विसरू शकणार नाही. आज मला संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै. नीलकंठराव रांगणेकर व कै. वसंतराव परुळेकर यांची तीव्रेतेने आठवण होत आहे.

माझा भाऊ बापू, ह्याचे तर मला सुरुवातीपासून निकेतनाचे व्यवस्थापन, अभ्यासक्रम, शिक्षक-शिक्षकेतरांच्या सेवाशर्ती, विद्यानिकेतनात काही वेळा उद्भवलेल्या विविध समस्या, इत्यादी अनेक बाबतीत सक्रिय सहकार्य आणि सल्ल्याचा स्वरूपातील मार्गदर्शन वेळोवेळी होत आहे. बापूला कोणीतही कमतरता फोनवर सांगावी आणि त्याने त्याचे निवारण करावे हे अविरत चालू आहे. 

वसतिगृहाच्या भोजनाच्या बाबतीत सुरुवातीस आमच्या सौ. मालनवहिनींनी पुढाकार घेऊन स्वयंपाकघरातील साहित्य विकत घेण्याच्या बाबतीत माझ्या आईच्या सौ. गिरिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला लोणची, पापड, मिरचीपावडर, मसाला तयार करून पाठविण्याच्या बाबतीत जे जिव्हाळ्याने व आत्मियतेने साहाय्य केले त्यामुळेच विद्यानिकेतनात कौटुंबिक वातावरण तयार होण्यास मदत झाली. आजही सौ. मालनवाहिनींचे माझी पत्नी सौ. श्रीलेखा हिला अनेकवेळा मार्गदर्शन होत असते.

विद्यानिकेतनाच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीती जातीने लक्ष घालून प्रारंभापासून मार्गदर्शन करीत असलेले कुलकर्णी-खानोलकर कंपनीचे ऑडिटर श्री. मोहनराव परुळेकर व श्री. पद्मनाभ परुळेकर (माजी विद्यार्थी ) ह्यांचे आभार मानवी तेवढे थोडेच होतील. तसेच बालमोहनचे कार्यालयीन प्रमुख श्री. जगन्नाथ परब आणि सौ. स्मिता राजाध्यक्ष यांचेही आर्थिक योजनेच्या बाबतीत पुष्कळ मार्गदर्शन मला झालेले आहे हे कृतज्ञतापूर्वक येथे सांगितले पाहिजे.

आज शाळेचे अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात स्पृहणीय यश मिळवून यशस्वी झाले आहेत. कोण स्वतंत्र उद्योगाशी संबंधित आहे, तर कोण संगीत, छायाचित्रण, क्रीडा, शेतीव्यवसाय, विज्ञानक्षेत्र, समाजकल्याण, इत्यादि विविध समाजोपयोगी क्षेत्रात आपापली प्रगती साधत आहेत. हे सर्व माजी विद्यार्थी जेव्हा जेव्हा शाळेत येतात, तेव्हा तेव्हा आपल्या विद्यानिकेतनाच्या वास्तव्यातील आठवणी काढून, गुरुजनांना खाली वाकून नमस्कार करून समाधान मिळवीत असतात. हीच आमची संपत्ती आणि हाच आमचा मान व अभिमान !

ह्या विद्यानिकेतनाच्या रौप्यमहोत्सवाचा शुभारंभ कै. रामभाऊ परुळेकर, ज्यांना गुरुस्थानी आहेत, अशा बहुपुरस्कृत व बहुश्रुत असलेल्या जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारच्या योजना आयोगाच्या मानद सदस्या डॉ. चित्रा नाईक ह्यांच्या शुभहस्ते रविवार, दिनांक ८ जानेवारी १९९५ रोजी संपन्न झाला ही विद्यानिकेतनाच्या इतिहासातील महत्वाची घटना मी समजतो. पुढील २५ वर्षात बालकांचा सर्वांगीण विकास अत्याधुनिक सुविधांच्या उपलब्धतेच्या माध्यमातून कशारीतीने साधता येईल ह्याचे तपशीलवार नियोजन करण्यामध्ये हे वर्ष आम्ही घालवत आहोत.

“जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरूनिया ।।” या तुकोबांच्या वाणीप्रमाणे माझ्या जीवनात जेव्हा काही अडचणी आल्या, तेव्हा कोणाच्यातरी रूपाने देव लाला मदत करावयास उभा राहिलेला आहे आणि मला पुढे पुढे नेट आलेला आहे. ज्या ज्या व्यक्तींशी माझा गेल्या २५ वर्षात परिचय होत गेला, त्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीचे व्यक्तिशः माझ्यावर ऋण आहे. माझ्या कार्यात विद्यानिकेतनाशी स्वतः होऊन समरस झालेले दादांचे माजी विद्यार्थी कै. अरुण आठल्ये, कै. नानासाहेब भालेराव आणि अजूनही सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेले डॉ. कृष्णकांत वाढोकर ह्यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या शैक्षणिक कार्यात भरीवता आणण्यास अशा अनेकांनी हातभार लावला आहे.

दोन तपांपूर्वी दादांनी ह्या विद्यानिकेतनाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवली आणि मी, ती माझ्या कुवतीनुसार माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने, सहकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याने पार पाडत आहे, ह्याचे मला खूप समाधान आहे. विद्यानिकेतनाच्या पुढील २५ वर्षांच्या कालावधीत विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थी आणि हितचिंतक निधीसंकलनाच्या बाबतीत मनापासून प्रयत्न करीत आहेत. त्याच्याविषयीची कृतज्ञता माझ्या मनात आहे.

आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण ! आजच्या शुभदिनी मी दादांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो.

स्व. श्रीलेखा श्रीपाद रेगे म्हणजेच श्रीलेखा मावशी

१९७० साली मुंबईतलं आयुष्य सोडून बाळसरांनी तळेगाव येथे जाऊन दादांचं, त्यांच्या गुरुचं स्मारकाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, पण तळेगाव येथे, ‘बालमोहन’ विचार रुजवणारी शाळा उभी करून दाखवेनच हा बाळसरांचा निर्धार होता, ह्या निर्धाराच्या मागे त्यांच्या पाठी उभ्या होत्या, त्यांच्या पत्नी स्व. श्रीलेखा श्रीपाद रेगे अर्थातच विद्यार्थ्यांच्या श्रीलेखा मावशी.

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या स्मरणातून श्रीलेखा मावशी कधीच जाऊ शकत नाहीत, इतकी माया त्यांनी मुलांना लावली. त्याकाळातील तळेगाव आणि परिसरातील ही पहिली वसतिगृहयुक्त शाळा. शाळेत बहुतांश मुलं ही ग्रामीण जीवनातून आलेली तर काही मुलं ही शहरी भागातून आलेली आहेत. ह्या मुलांना कधीही घराबाहेर रहायची सवय नाही. कित्येकांना तर वसतिगृहातील अनेक सोयीसुविधांचा परिचय देखील नव्हता. अशा वातावरणातून आलेल्या मुलांच्या त्या ‘मावशी’ बनल्या. शाळेच्या वसतिगृहातील मुलं ही आपली मुलं मानून, त्यांनी त्यांची शुश्रुषा केली, त्यांचं हवं नको ते बघितलं, त्यांना एकटं वाटणार नाही ह्यासाठी त्यांच्याशी त्या बोलत रहायच्या.

ही मुलं आयुष्यात पहिल्यांदाच घरापासून दूर राहिलेली, अशा वेळेस ती अनेकदा घराच्या आठवणीने ती व्याकुक होत, अशावेळेस ह्या व्याकुळ झालेल्या मुलांना जवळ घेणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवणं ह्या गोष्टी श्रीलेखा मावशींनी केल्या. सणासुदीला तर मुलं घराच्या आठवणीने दुःखी होऊ नयेत म्हणून, मुलांच्या जेवणात गोडाधोडाचे पदार्थ असतील हे कटाक्षाने बघत. मुलांच्या चवी काय आहेत हे समजून तसं जेवण त्यांना मिळेल ह्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं.

‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ वसतिगृहयुक्त शाळा म्हणून नावारूपाला आली ती ज्या मोजक्या व्यक्तींमुळे त्यात श्रीलेखा मावशींमुळे. बालमोहन परिवार श्रीलेखा मावशींबद्दल कायमच ऋणी आहे

विजयाताई फेणाणी

विजयाताई फेणाणी ह्या रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनमधल्या मुलांच्या आईच होत्या. एक उत्तम शिक्षिका. बालमोहन परिवाराशी जोडल्या गेलेल्या शिक्षिका. दादांनी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनची जबाबदारी सोपवली आणि १० जुलै १९७१ पासून त्या मुंबईच्या आयुष्याचा त्याग करून तळेगाव येथे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन परिवाराशी जोडल्या गेल्या त्या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. २४ जुलै १९९४ ला त्यांचं दुर्धर आजाराने निधन झालं पण विजयाताई ह्या आजारात सुद्धा कार्यरत होत्या.

विद्यार्थ्यांची शुश्रूषा करण्यापासून ते कर्मचाऱ्यांना काय हवं नको ते बघण्यापर्यंत त्यांनी सर्व मायेनं केलं. विजयाताईंच्या ह्या सेवेबद्दल बालमोहन परिवार सदैव ऋणी राहील.

१० जुलै १९७१ ते २४ जुलै १९९४ ला एका दुर्धर आजाराने निधन होईपर्यंत विजयाताई फेणाणी ह्यांनी आपलं सर्वस्व ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ला अर्पण केलं होतं. विजयाताई ह्या उत्तम शिक्षिका होत्या. जेंव्हा दादांनी १९७० ला रामभाऊ विद्यानिकेतनची स्थापना केली, त्यावेळेस बाळसरांच्या सोबत एका चांगल्या शिक्षिकेची आणि त्याच्याच जोडीला ही वस्तिगृहयुक्त शाळा आपली मानून त्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीची गरज दादांना होती. विजयाताईंनी ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

त्या १९७१ ला तळेगावला गेल्या. शाळेत शिकवण्याचा अनुभव विजयाताईंना होता, पण खेडेगावातील वसतिगृहातील शाळा, तिथे येणारी बहुतांश मुलं ही ग्रामीण जीवनातून आलेली तर काही शहरांतून आलेली, त्या दोघांची जडणघडण वेगळी. पण दोघांच्या जीवनशैलीचा समतोल साधत, सगळी आव्हानं स्वीकारत विजयाताईंनी शिक्षकाचं व्रत तर स्वीकारलंच, पण शाळा संपल्यावर त्या वसतिगृहातील मुलांना काय हवं नको ते देखील तितक्याच आस्थेने, मायेने बघायच्या. शाळेतील विद्यार्थी जर आजारी पडले तर त्या रात्र रात्र जागून त्यांची शुश्रूषा करत, मुलांना शिस्त लावताना त्यांना ती शिस्त कठोर वाटू नये, उलट ही शिस्त त्यांनाच कशी फायद्याची आहे हे पटवून देत त्या शिस्तीचे संस्कार करत.

शाळेतील कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी खूप माया लावली होती. कर्मचारीच नव्हे तर त्यांचं कुटुंब पण त्यांनी आपलं कुटुंब मानलं होतं. म्हणूनच शाळेतील विद्यार्थी असोत की कर्मचारी ह्यांच्यासाठी त्या कधीच फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या त्या सगळ्यांच्या विजया’ताई’ झाल्या.

विद्यानिकेतनला विजयाताईंनी सर्वस्व दिलं, इतकंच नाही तर त्यांच्या पश्चात, विजयाताईंच्या इच्छेनुसार त्यांच्या भगिनींनी शाळेला २ लाखाची देणगी देखील दिली.

बालमोहन परिवार विजयाताईंच्या सदैव ऋणात आहे.

डॉ. मोरेश्वर शिवराम तथा बापूसाहेब रेगे

दादांच्या या सुपुत्राचा जन्म २१ जुलै १९३१ रोजी माटुंग्याच्या रिफॉर्मेटरी स्कूलच्या सिमेंटच्या चाळीत झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय येथे पार पडले. १९५७ मध्ये त्यांनी रूपारेल महाविद्यालय, दादर इथून मुंबई विद्यापीठाची एम.ए.(मराठी व संस्कृत) मिळवली. १९६२ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. (शिक्षण) अर्जित केली.

लहानपणापासून दादांबरोबर असल्याने त्यांच्या आजूबाजूचे वातावरण नेहमीच शैक्षणिक होते. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षापासून ते दादांबरोबर सावलीसारखे होते. या वातावरणामुळे आणि दादांच्या सहवासामुळे अत्यंत नैसर्गिकपणे ते शिक्षकी पेशाकडे आकर्षित झाले. त्यांचा व्यासंग आणि अथक मेहनत ह्यांची दादांची स्वप्ने साकार होण्यासाठी फार मोलाची मदत झाली. बालमोहनला महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था बनवण्यासाठी बापूसरांनी अथक मेहनत केली. आपल्या नेतृत्वगुणांमुळे त्यांनी शिक्षणाला वाहून घेतलेल्या शिक्षकांची फळी विकसित केली.

त्यांच्या मेहनतीवर आणि नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवून दादांनी अत्यंत विश्वासाने बालमोहनची धुरा बापूसाहेबांच्या हाती सोपवली आणि दादांचा हा विश्वास खरा ठरवत त्यांनी शाळेचा मानसन्मान वाढवला. काळाच्या पुढे असलेले अनेक आदर्श उपक्रम बालमोहनमध्ये सुरु करण्यामागे त्यांची भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी दिसून येते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बालमोहनने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली.

दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बालमोहनमध्ये अध्यापन आणि प्रशासकीय अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. १९५४ ते १९७० ही १६ वर्षे शिक्षक म्हणून, १९६३ ते १९८९ ही २६ वर्षे उपअधीक्षक म्हणून, १९७० ते १९८९ ही १९ वर्षे मुख्याध्यापक म्हणून आणि १९८९ ते २००९ ही २० वर्षे अधीक्षक म्हणून त्यांनी बालमोहनमध्ये काम केले. १९७० ते १९८२ या कालावधीत ते बालमोहन विद्यामंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य होते तर १९८२ ते २००८ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त पदाची जबाबदारी पार पाडली. त्यांनतर २००८ पासून अखेरपर्यंत ते संस्थेचे विश्वस्त आणि प्रमुख मार्गदर्शक सल्लागार होते.

‘युनेस्को’ ह्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या ‘International Understanding Project’ मध्ये त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून सहभाग घेतला होता. मुंबईच्या लोककल्याण शिक्षणसंस्थेचा नियामक मंडळ सदस्य, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या नात्याने १९७८ ते २००८ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव येथील शिक्षण संस्थांचा विकास साधताना त्यांनी केलेली शिक्षणसेवा आजही स्थानिक लोकांच्या स्मरणात आहे. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष या नात्याने त्यांचा बालशिक्षणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग होता. अनेक शासकीय समित्यांवर शासननियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले.

बालमोहनच्या अनेक प्रकाशनांचे संपादक म्हणून त्यांनी आपले योगदान दिले. २००६ साली प्रकाशित झालेल्या ‘किमयागार दादा’ या शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी स्मृतीग्रंथाच्या लेखन, संकलन आणि संपादनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. वृत्तपत्रे व नियतकालिके यांमधून मार्गदर्शनाच्या स्वरूपात त्यांचे अनेक शैक्षणिक लेख प्रसिद्ध झाले. ‘आठवणीतील पाउले’ हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथालीने २०१२ साली प्रकाशित केले.

१९६४ पासून त्यांनी इंग्रजी अध्यापनावर महाराष्ट्र राज्यात वसई, नाशिक, सटाणा, नंदूरबार, रत्नागिरी, इत्यादी निरनिराळ्या ठिकाणी विविध प्रकारची शिबिरे घेतली, तसेच विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वाचे आठवडाभराचे शिक्षण शिबिर देवळाली येथे १९७४ ते १९७८ या कालावधीत घेतले. शासकीय योजनेच्या अंतर्गत १९७५ ते १९७९ या कालावधीत शाळा समूह योजना बालमोहनमध्ये आयोजित करून महानगरपालिकेतील २० शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून इंग्रजी अध्यापनाचे प्रशिक्षण दिले.

शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना ‘मुंबई सकाळ’ ह्या दैनिक वृत्तपत्रातर्फे ‘सकाळ’च्या वर्धापनदिनी शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान (१९९३); मुंबई वृत्तपत्र लेखक संघातर्फे शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘समाजभूषण पुरस्कार’ (१९९४); दादरकरांतर्फे ‘समाजभूषण पुरस्कार’ (२००४); मुंबई लक्षदीपतर्फे मराठी अस्मितेसाठी आदर्श योगदान केल्याबद्दल ‘सप्तरत्न पुरस्कार’ (२००७); सारस्वत चैतन्यतर्फे शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान (२०१०) असे अनेक सन्मान मिळाले.

२४ नोव्हेंबर २०१३ रोजी बालमोहनच्या या सुपुत्राचे देहावसान झाले.