अनुभवसिद्ध विद्यार्थी

घोकंपट्टीतून माहिती डोक्यात कोंबण्यापेक्षा, प्रत्यक्ष अनुभवातून निरीक्षण करत मुलं जे आणि जितकं शिक्षण ते अनुभवसिद्ध शिक्षण.
‘निसर्गशाळा’ हा एक विचार, निसर्गस्नेही विद्यार्थी हाच त्या विचाराचा केंद्रबिंदू.
तळेगाव आणि आसपासच्या परिसरातील मुलांसाठी एक उत्तम शाळा असावी आणि तोपर्यंत मान्यता पावलेला बालमोहन विचार त्यांच्यात देखील रुजावा म्हणून १९७० साली ह्या शाळेची स्थापना झाली. त्या वेळेस शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांना शाळेबद्दलची आवड निर्माण व्हावी ह्यासाठी ते ज्या विश्वात जगत होते तसं वातावरण इथे निर्माण केलं गेलं. सुरुवातीच्या काळात शाळेच्या आवारात शेती होत, त्या शेतीत पिकलेलं अन्नच मुलांना वसतिगृहात दिलं जात. शाळेच्या आवारात गोशाळा होती. मुलं मातीत हात घालून शेती करत होती. पण हे सगळं उभं करण्याच्या मागे दादांचा एक वेगळा उद्देश देखील होता. तो म्हणजे ह्या वातावरणाचा, इथल्या अकृत्रिमतेचा अनुभव शहरी भागातील मुलांनी घ्यावा. निसर्ग हा मोठा शिक्षक असतो ह्या सुविचाराचं निव्वळ पाठांतर करायच्या ऐवजी ते अनुभवावं.
वर एका ठिकाणी म्हणल्याप्रमाणे ही फक्त शाळा नाही तर ती एक प्रयोगशाळा आहे. त्यामुळे कालानुरूप बदल होत गेले. आज शाळेच्या आवारात जरी शेती होत नसली तरी कार्यानुभवातून शिक्षण देणाऱ्या अनेक सोयी आहेत. बागकाम, सुतारकाम पासून ते अगदी मातीची भांडी बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी इथे करून बघता येतात आणि त्यातून अनेक विज्ञान शाखांतील नियमांचा अनुभ घेता येतो. शाळेला अतिविस्तीर्ण पटांगण आहे, मैदानी खेळांच्या सुविधा आहेत. खेळ जर व्यक्तिमत्व घडवत असेल तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव इथे घेता येतो. आज कोव्हीडनंतर वसतिगृह बंद असलं तरी सहचर्य हे इथल्या वसतिगृहात बिंबवलं जात होतं. थोडक्यात आमचा विद्यार्थी अनुभवसिद्ध व्हावा ह्यासाठी जमतील तितके प्रयोग आम्ही इथे करत असतो.